अमेरिका भारताला मोठा झटका देण्याच्या तयारीत? 'त्या' खरेदीवरून कारवाईची शक्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: October 7, 2021 04:20 PM2021-10-07T16:20:17+5:302021-10-07T16:22:24+5:30
भारत रशियामध्ये झालेल्या करारावरून अमेरिका नाराज; आक्षेप नोंदवला
नवी दिल्ली/वॉशिंग्टन: भारतानंरशियाकडून एस-४०० मिसाईल डिफेन्स सिस्टिम खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताच्या या निर्णयाला अमेरिकेनं पुन्हा एकदा आक्षेप नोंदवला आहे. रशियाकडून एस-४०० ट्रायम्फ क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी करण्याचा निर्णय भारत आणि अमेरिकेच्या संबंधांमध्ये समस्या असल्याचं ज्यो बायडन प्रशासनातील एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं म्हटलं आहे.
अमेरिकेच्या डेप्युटी सेक्रेटरी ऑफ स्टेट वेंडी शर्मन सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी काल पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी त्यांनी एस-४०० क्षेपणास्त्र सुरक्षा यंत्रणा खरेदी करण्याच्या निर्णयाबद्दल आक्षेप नोंदवला. हा करार सुरक्षेच्या दृष्टीकोनातून कोणाच्याच हिताचा नाही, असं शर्मन म्हणाल्या. भारत आणि अमेरिका यांचे संबंध अतिशय मजबूत असून दोन्ही देश द्विपक्षीय चर्चेतून हा मुद्दा सोडवतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
'जो देश एस-४०० यंत्रणेचा वापर करतो, त्यांच्याबद्दलची आमची भूमिका आणि धोरण स्पष्ट आहे. एस-४०० यंत्रणा धोकादायक आहे आणि ती कोणाच्याही हिताची नाही. मात्र तरीही भारत आणि अमेरिकेचे संबंध अतिशय दृढ आहेत,' असं शर्मन यांनी सांगितलं. नाटो संघटनेचा सदस्य असलेल्या तुर्कस्ताननं एस-४०० क्षेपणास्त्र यंत्रणा खरेदी केल्यावर अमेरिकेनं त्यांच्यावर निर्बंध लादले होते. त्यामुळे अशीच कारवाई भारताविरोधात केली जाण्याची शक्यता आहे.
द्विपक्षीय चर्चेतून मुद्दा सुटेल; अमेरिकेला विश्वास
एस-४०० क्षेपणास्त्र खरेदी करण्याच्या भारताच्या निर्णयाबद्दल अमेरिकेनं नाराजी व्यक्त केली. एस-४०० खरेदी केल्याबद्दल अमेरिका भारतावर निर्बंध लादणार का, असा प्रश्न एका पत्रकारानं शर्मन यांना विचारला. त्यावर आम्ही भविष्याबद्दल बराच विचार करत आहोत. दोन्ही देशांनी चर्चेच्या माध्यमातून अनेक समस्या सोडवल्या आहेत. ही समस्यादेखील आम्ही सोडवू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.