चारधाम यात्रा सुरु होण्यापूर्वीच धोकादायक व्हायरस सापडला; उत्तराखंड अलर्ट मोडवर, क्वारंटाईन सेंटर सुरु
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2025 22:12 IST2025-04-01T22:12:24+5:302025-04-01T22:12:51+5:30
येत्या ३० एप्रिलला चारधाम यात्रा सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्राण्यांमध्ये व्हायरस सापडल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे.

चारधाम यात्रा सुरु होण्यापूर्वीच धोकादायक व्हायरस सापडला; उत्तराखंड अलर्ट मोडवर, क्वारंटाईन सेंटर सुरु
चारधाम यात्रा सुरु होण्यापूर्वीच मोठी खळबळ उडाली आहे. यात्रेकरूंकडून साहित्य आणि प्रवासासाठी वापरल्या जाणाऱ्या घोडे आणि खेचरांमध्ये धोकादायक एक्वाईन इन्फ्लुएन्झा व्हायरस सापडला आहे. यामुळे उत्तराखंड सरकारमध्ये धावपळ उडाली असून तातडीने दोन क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहेत.
येत्या ३० एप्रिलला चारधाम यात्रा सुरु होणार आहे. या पार्श्वभूमीवर प्राण्यांमध्ये व्हायरस सापडल्याने आरोग्य विभागाची झोप उडाली आहे. रुद्रप्रयाग जिल्ह्यात दोन क्वारंटाईन सेंटर सुरु करण्यात आले आहेत.
अक्षय्य तृतीयेला गंगोत्री-यमुनोत्रीचे दरवाजे उघडले जाणार आहेत. तर केदारनाथ धामचे २ मे रोजी दरवाजे उघडले जाणार आहेत. त्यानंतर दोन दिवसांनी बद्रीनाथ धामचे दरवाजे उघडले जाणार आहेत. घोड्यांमध्ये सापडलेल्या व्हायरसमुळे आरोग्य विभाग आणि पशुपालन विभाग सतर्क झाला आहे. मंत्री सौरभ बहुगुणा यांनी तातडीने विभागाची बैठक बोलवून खबरदारी घेण्याचे आदेश दिले आहेत.
१२ घोड्यांमध्ये हा व्हायरस सापडला आहे. यामुळे प्राण्यांची तपासणी करण्याचे निर्देश मंत्र्यांनी दिले आहेत. तसेच निष्काळजी काळजी करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कोणत्याही आजारी घोड्याला किंवा खेचराला चारधामला नेण्याची परवानगी दिली जाणार नाही. चारधाम यात्रेसाठी ऑनलाइन नोंदणी सुरू झाली आहे. महाकुंभामुळे देशात भक्तीमय वातावरण तयार झाल्याने गेल्या वेळेचा विक्रम मोडला जाईल असा अंदाज आहे.