‘डेंग्यू’ रुग्णाला आवश्यकता नसताना प्लेटलेट देणे धोक्याचे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2016 05:57 AM2016-09-24T05:57:37+5:302016-09-24T06:34:49+5:30

डेंग्यूच्या रुग्णाला आवश्यकता नसताना प्लेटलेट (रक्तबिंबाणू) चढविणे धोक्याचे असून, त्यामुळे रुग्णात सेप्सीससारखी गुंतागुंत संभवते

Dangue is dangerous for giving platelets when the patient is not needed | ‘डेंग्यू’ रुग्णाला आवश्यकता नसताना प्लेटलेट देणे धोक्याचे

‘डेंग्यू’ रुग्णाला आवश्यकता नसताना प्लेटलेट देणे धोक्याचे

Next


नवी दिल्ली : डेंग्यूच्या रुग्णाला आवश्यकता नसताना प्लेटलेट (रक्तबिंबाणू) चढविणे धोक्याचे असून, त्यामुळे रुग्णात सेप्सीससारखी गुंतागुंत संभवते, असे आरोग्यतज्ज्ञांनी म्हटले आहे. संसर्गाला प्रतिकार करताना शरीराकडून स्वत:च्याच पेशी आणि अवयवांना इजा पोहोचविली जाण्याच्या आजाराला ‘सेप्सीस’ असे म्हणतात. हा आजार प्राणघातक आहे. दिल्लीत या विषाणूजन्य आजाराने १९ जणांचा बळी घेतला. रुग्णांची संख्या १,३०० वर पोहोचली आहे.
डेंग्यूच्या रुग्णांत रक्तातील प्लेटलेटस्चे प्रमाण घसरते आणि जर त्याची भरपाई झाली नाही, तर रुग्णाच्या जीवाला धोका संभवू शकतो. मात्र, प्लेटलेट कमी झाल्यानंतर सरधोपटपणे प्लेटलेट चढविणे हा त्यावर उपाय नाही किंवा तो एकमेव पर्यायही नाही.
मुळात डेंग्यूच्या बहुतांश रुग्णांना प्लेटलेट चढविण्याची गरजच नसते. याबाबत लोकांत जागृती घडवून आणण्याची गरज आहे, असे हृदयरोगतज्ज्ञ आणि इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) भावी अध्यक्ष डॉ. डी.के. अग्रवाल यांनी सांगितले.
हार्ट केअर फाऊंडेशन आॅफ इंडिया आणि आयएमएने प्लेटलेट चढविण्याच्या विषयावर आज संयुक्तपणे वेबकास्ट उपक्रम घेतला. प्लेटलेट हा डेंग्यूने प्रभावित होणाऱ्या रक्तघटकांतील प्रमुख घटक आहे. प्लेटलेटचे रक्तातील सामान्य प्रमाण १.५ ते ४.५ लाख एवढे असते. आवश्यकता नसताना प्लेटलेट दिल्यास अधिक इजा होऊन रुग्णांत सेप्सीस तसेच रक्त संक्रमणाशी संबंधित इतर गुंतागुंत संभवते, असे मिशन जन जागृती ब्लड बँकेचे वैद्यकीय संचालक डॉ. एन.के. भाटिया यांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>संकेत समजल्यास डेंग्यूचे सर्व मृत्यू टाळता येऊ शकतात
डेंग्यू हॅमरहगिक फीव्हरच्या रुग्णांत प्लेटलेटचे प्रमाण २० हजार किंवा त्याहून खाली घसरल्यास रक्तस्राव होऊ शकतो. बहुतांश डेंग्यू रुग्णांना ही वेळच येत नाही, असे अग्रवाल म्हणाले. डेंग्यू रुग्णांत गुंतागुंत निर्माण होण्याचे प्रमाण केवळ एक टक्का आहे. लोकांना धोक्याचे संकेत समजल्यास डेंग्यूचे सर्व मृत्यू टाळता येऊ शकतात. सर्व डेंग्यू रुग्णांना प्लेटलेट चढविण्याची आवश्यकता असते; यात तथ्य नाही. यंत्राद्वारे मिळविलेली प्लेटलेटस्ची संख्या विश्वसनीय नसून त्यात ४० हजारांपर्यंतची तफावत आढळते, असा दावाही त्यांनी केला. डेंग्यूने गंभीर आजारी असलेल्या रुग्णांत नव्याने तयार झालेल्या प्लेटलेटस्चे प्रमाण ठराविक पातळीएवढे किंवा त्याहून अधिक असेल, तर अशा रुग्णांना प्लेटलेट देण्याची गरज नसते, असे अलीकडेच झालेल्या अभ्यासात आढळले आहे.

Web Title: Dangue is dangerous for giving platelets when the patient is not needed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.