दानशूर चहावाला! गरीबांची सेवा करण्यासाठी विकलं स्वत:चं घर; तुम्हीही कराल भरभरून कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2023 04:24 PM2023-05-01T16:24:12+5:302023-05-01T16:24:35+5:30
संजय लोकांना मोफत चहा आणि बिस्किटे खाऊ घालतो. सकाळचा चहा झाल्यावर पती-पत्नी मिळून गरिबांसाठी जेवण बनवतात आणि नंतर त्यांना खाऊ घालतात.
भारतात चहा पिणाऱ्यांची कमतरता नाही. अनेक चहावालेही खूप प्रसिद्ध झाले आहेत. ज्यामध्ये एमबीए चायवाला, ग्रॅज्युएट चायवाली यांचा समावेश आहे. पण आता असा चहावाला समोर आला आहे ज्याचं काम पाहून तुम्हीही कौतुक कराल. संजय चंद्रवंशी असं या चहावाल्याचं नाव असून तो गया जिल्ह्यातील रहिवासी आहे. संजयच्या दातृत्वाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा आहे.
गया शहरातील जयप्रकाश नारायण हॉस्पिटलजवळ संजयचे चहाचे दुकान आहे. त्याचं दुकान संपूर्ण शहरात इतकं प्रसिद्ध आहे की रोज सकाळी त्या दुकानावर असहाय आणि गरीब लोकांची गर्दी असते. संजय या लोकांना मोफत चहा आणि बिस्किटे खाऊ घालतो. सकाळचा चहा झाल्यावर पती-पत्नी मिळून गरिबांसाठी जेवण बनवतात आणि नंतर त्यांना खाऊ घालतात.
संजय कुमार चंद्रवंशी म्हणाला की, त्याच्या आजोबांच्या काळापासून कुटुंबात दानधर्माची परंपरा चालू आहे की त्यांचे कुटुंब गेली 250 वर्षे आणि 5 पिढ्यांपासून गरिबांना आधार देत आहे. काही वर्षांपूर्वी त्यांच्याकडे मोठी आर्थिक कोंडी झाली होती आणि त्यानंतर ते खूप अस्वस्थ झाले होते. कारण ते गरिबांना चहा आणि जेवण देऊ शकत नव्हते. त्यामुळे त्यांनी शहरातील कंदी नवाडा भागात असलेले घर लोकांच्या सेवेसाठी 11 लाख रुपयांना विकले.
घर विकून आलेले पैसे गरिबांच्या मदतीसाठी वापरले. आता तो कुटुंबासह भाड्याच्या घरात राहतो. संजय चंद्रवंशी यांचे ज्युसचेही दुकानही आहे. दुकानातून मिळणाऱ्या उत्पन्नापैकी अर्धी रक्कम गरिबांवर खर्च केली जाते. अनेकांनी त्यांच्या कामाचे कौतुक केले. लॉकडाऊन दरम्यान, संजय आणि त्याचे कुटुंब दिवसातून तीन वेळचे जेवण बनवायचे आणि गरिबांना खाऊ घालायचे. मात्र त्यांची आर्थिक स्थिती ढासळल्यानंतर आता ते लोकांना एकवेळचे जेवण देत आहेत. अशा कामातून आनंद मिळतो, असे संजयचे मत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"