मधुबनीनंतर आता चित्रांनी रंगणार दरभंगा स्टेशन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 5, 2018 01:41 AM2018-02-05T01:41:40+5:302018-02-05T01:42:00+5:30
बिहारमधील मधुबनी रेल्वे स्टेशन आता पूर्णपणे मधुबनी पेंटिंग्जनी रंगले आहे. एके काळी सर्व स्टेशनांप्रमाणे रूक्ष दिसणाºया मधुबनीला रंगवले आणि मधुबनीच्या चित्रकारांनी.
- एस. पी. सिन्हा
पाटणा : बिहारमधील मधुबनी रेल्वे स्टेशन आता पूर्णपणे मधुबनी पेंटिंग्जनी रंगले आहे. एके काळी सर्व स्टेशनांप्रमाणे रूक्ष दिसणाºया मधुबनीला रंगवले आणि मधुबनीच्या चित्रकारांनी. तेही एक पैसा न घेता. आता दरभंगा रेल्वे स्टेशनही असेच रंगणार आहे.
बिहारमधील रेल्वे स्टेशन आणि तेथील प्रवास म्हणताच अनेकांच्या अंगावर काटा येतो. अस्वच्छ स्टेशन्स आणि सरसकट फसवणूक यासाठी बिहारची अनेक रेल्वे स्टेशन ओळखली जातात. रेल्वेतून प्रवास करताना हमखास चोºया येतात. आरक्षित डब्यात कोणीही घुसते आणि तुमच्या जागेवर येऊन बसते. तुम्ही सवाल केला, तर तुम्हालाच दमदाटी होते, पण हे चित्र बदलण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. त्याचा पहिला टप्पा म्हणून रेल्वे स्टेशनना चांगले रूपडे दिले जाणार आहे.
मधुबनी स्टेशनचा कायापालट केला तब्बल ६0 चित्रकारांनी. मधुबनी वा मिथिला पेंटिंग्ज या नव्या प्रकाराला यातून प्रोत्साहन मिळाले आहे. रेल्वेने त्याला रंग आणि ब्रशन इतकेच साहित्य दिले. बाकी सारे या चित्रकारांनी स्वत:हून केले. म्हणजे हे कलाकारांचे श्रमदानच म्हणायला हवे. यात अनेक महिला कलाकारही सहभागी होत्या. तब्बल साडेसात हजार चौरस फूट जागेवर या कलाकारांनी मिथिला नावाने ओळखल्या जाणाºया चित्रप्रकारातील पेटिंग्ज रंगवली.
>हा विश्वविक्रमच ठरेल!
खरे तर मधुबनी पेटिंग्जचे मुख्य केंद्र मधुबनी आहे. तरीही तिथे अशा पेटिंग्जचे एकही केंद्र नाही. रेल्वे स्टेशनच्या रूपाने आपोआप केंद्र इथे तयार झाले आहे. स्थानिक लोकही आता रेल्वे स्टेशन पाहून खूश झाले आहेत. तिथे कचरा टाकत नाहीत, पान खाऊ न थुंकत नाहीत आणि स्टेशन स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्नही करतात. ही चित्रे म्हणजे एक विश्वविक्रम आहे, असे रेल्वे अधिकाºयांचे म्हणणे आहे.