CAA : माझं सरकार बरखास्त करण्याचं धाडस करुनच दाखवा; ममता बॅनर्जींचं थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: December 16, 2019 06:03 PM2019-12-16T18:03:56+5:302019-12-16T18:41:20+5:30
Citizenship Amendment Act : सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात ममता बॅनर्जी आक्रमक; कोलकात्यात मोठा मोर्चा
कोलकाता: तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन मोदी सरकारला थेट आव्हान दिलं आहे. कोलकात्यात भव्य रॅली काढून बॅनर्जींनी सुधारित नागरिकत्व कायद्यावरुन सरकारला लक्ष्य केलं. राज्यात नवा कायदा लागू करणार नाही. केंद्रानं माझं सरकार बरखास्त करण्याची हिंमत करुन दाखवावी, असं खुलं आव्हान ममता यांनी दिलं. ममता बॅनर्जींनी काढलेल्या रॅलीत शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.
तुम्हाला माझं सरकार बरखास्त करायचं असेल, तर खुशाल बरखास्त करा. पण मी बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणी आणि सुधारित नागरिकत्व कायद्याची अंमलबजावणी होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा ममता बॅनर्जींनी घेतला आहे. त्यांना वाटतं ममता बॅनर्जी एकट्या आहेत. मात्र आता माझ्यासोबत कित्येक जण आहेत. तुमचा हेतू चांगला असेल, तर जनता तुमच्या सोबत असते, असं त्या जनसभेला संबोधित करताना म्हणाल्या. ही धर्मासाठीची लढाई नाही, तर हक्कांसाठी चाललेला संघर्ष असल्याचं त्यांनी म्हटलं.
.@MamataOfficial. I am extremely anguished that CM and Ministers are to spearhead rally against CAA, law of the land. This is unconstitutional. I call upon CM to desist from this unconstitutional and inflammatory act at this juncture and devote to retrieve the grim situation.
— Jagdeep Dhankhar (@jdhankhar1) December 16, 2019
ममता बॅनर्जींच्या मोर्चाला बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यापासून सुरुवात झाली. जोरासांको ठाकूरबाकी (रविंद्रनाथ टागोर यांचं बालवयात वास्तव्य असलेलं ठिकाण) इथं या आंदोलनाची सांगता झाली. ममता बॅनर्जींनी काढलेल्या या मोर्चाबद्दल राज्यपाल जगदीप धनखर यांनी नाराजी व्यक्त केली. ममतांचा मोर्चा घटनाबाह्य असल्याची टीका धनखर यांनी केली. 'मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी सुधारित नागरिकत्व कायद्याविरोधात काढलेल्या मोर्चामुळे मी दु:खी आहे. त्यांचं हे पाऊल घटनाविरोधी आहे. यामुळे परिस्थिती चिघळू शकते,' असं ट्विट राज्यपालांनी केलं आहे. राज्यपाल धनखर आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यात याआधीही अनेकदा वाद झाला आहे.