दार्जिलिंग अशांत; पर्यटक वळले सिक्किमकडे
By Admin | Published: June 21, 2017 01:34 AM2017-06-21T01:34:34+5:302017-06-21T01:34:34+5:30
पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक कमाईच्या या हंगामात दार्जिलिंगमध्ये अशांतता व बंद असल्याने त्याचा लाभ सिक्किमला आणि त्यातही विशेषत: गंगटोक शहराला होत आहे.
गंगटोक : पर्यटनाच्या दृष्टिकोनातून सर्वाधिक कमाईच्या या हंगामात दार्जिलिंगमध्ये अशांतता व बंद असल्याने त्याचा लाभ सिक्किमला आणि त्यातही विशेषत: गंगटोक शहराला होत आहे.
दार्जिलिंगमध्ये गोरखा जनमुक्ती मोर्चाचे (जीजेएम) आंदोलन सुरू असल्यामुळे पर्यटक दार्जिलिंगऐवजी सिक्किमला पसंती देत
आहेत. दार्जिलिंगमधील तणावामुळे येथील पर्यटन उद्योगाने अचानक उसळी घेतली आहे, असे सिक्किमचे पर्यटन सचिव सी. जांगपो यांनी सांगितले.
दार्जिलिंगमधील जीजेएम आंदोलनामुळे तेथे जाण्याचा बेत आखलेल्या अनेक देशी आणि परदेशी पर्यटकांनी बुकिंग रद्द केली असून, ते आता सिक्किमला जाण्याच्या तयारीत आहेत. गंगटोक येथील पर्यटन विषयक प्रतिष्ठानांत सध्या अनेक ग्राहक असून, आगामी अनेक दिवसांसाठी तेथील बुकिंग पूर्ण झाली आहेत.
पर्यटनासाठी सिक्कीमला येणारे सर्व पर्यटक प्रवासाच्या आपल्या दुसऱ्या टप्प्यात दार्जिलिंगला जाणार होते किंवा येथे येण्यापूर्वी ते दार्जिलिंगला गेले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणातील पर्यटकांचे व्यवस्थापन करणे कठीण असल्याचे ट्रॅव्हल आॅपरेटरांनी सांगितले.
आम्ही ट्रॅव्हल आॅपरेटर
आणि हॉटेलांना सेवेच्या दर्जाशी तडजोड न करता अधिकाधिक
संख्येत पर्यटकांना सेवा देण्यास सांगितले आहे. कारण, यावेळी कोणत्याही प्रकारच्या गैर व्यवस्थापनामुळे पर्यटन उद्योगाची बदनामी होऊ शकते, असे जांगपो यांनी सांगितले.
दार्जिलिंग ठप्पच
दार्जिलिंग : गोरखा जनमुक्ती मोर्चाच्या (जीजेएम) बेमुदत बंदमुळे सलग सहाव्या दिवशी दार्जिलिंग ठप्प होते. जीजेएमने स्वतंत्र राज्याच्या मागणीसाठी हा बंद पुकारला आहे. आंदोलनाची पुढची दिशा ठरविण्यासाठी मंगळवारी घेण्यात आलेल्या सर्वपक्षीय बैठकीत बंद सुरूच ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. इंटरनेट सेवा आजही बंद होती. औषधांची दुकाने वगळता अन्य सर्व दुकानेही बंद होती.
आम्ही सुट्यांमध्ये दार्जिलिंगला गेलो; मात्र तेव्हाच हे आंदोलन सुरू झाले. आमच्या ट्रॅव्हल एजंटांनी सिक्किममधील आॅपरेटरांशी तात्काळ संपर्क साधला. बुकिंग मिळाल्यामुळे आम्ही सुदैवी ठरलो, असे कोलकात्याचे एक पर्यटक शांतनू बोस यांनी सांगितले. अनेक पर्यटकांना बुकिंग न मिळाल्यामुळे दार्जिलिंगहून परतावे लागले, असेही बोस यांनी सांगितले.