अमरनाथच्या बर्फ शिवलिंगाचं पहिलं दर्शन, फोटो पाहून भाविकांमध्ये 'यात्रा पे चर्चा'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 3, 2020 08:18 PM2020-06-03T20:18:39+5:302020-06-03T20:21:53+5:30
देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला काहीच दिवस उरले आहेत.
बाबा बर्फानीचा यंदाच्या मोसमातील पहिला फोटो समोर आला आहे. या फोटोत अमरनाथ गुहा दिसत असून समोरील परिसर दिसून येत आहे. गुहेच्या चारही बाजूंना बर्फ दिसून येत असून हे फोटो नेमकं कुणी घेतले आहेत, याबद्दल माहिती नाही. दरम्यान, २३ जूनपासून अमरनाथ यात्रेला सुरुवात होत आहे. मात्र, देशात अद्याप कोरोनाचे संकट आणि लॉकडाऊन असल्याने या यात्रेला परवानगी मिळणार का नाही, याबाबत अद्याप काहीही स्पष्टीकरण नाही. यापूर्वी २२ एप्रिल रोजी अमरनाथ श्राइन बोर्डने यात्रा रद्द करण्यांदर्भातील एक परिपत्रक जारी केले होते.
देशातील कोट्यवधी भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या अमरनाथ यात्रेला काहीच दिवस उरले आहेत. मात्र, या यात्रेवर कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे अमरनाथ श्राइन बोर्डाने यंदा केवळ १५ दिवसांचाच यात्रा कालावधी असावा, अशी मागणी केली आहे. तसेच, या यात्रेचा पारंपरिक मार्ग पहलगाम येथून निघतो, पण यंदा बालटाल मार्गावरुन यात्रेकरुंचा प्रवास व्हावा असेही बोर्डाने म्हटले आहे.
जम्मू काश्मीरच्या राजभवनमध्येही अमरनाथ यात्रा होणार की नाही याबाबत चर्चा झाली. राजभवनकडून अमरनाथ यात्रा रद्द करण्यात आल्याचे परिपत्रक जारी करण्यात आले होते. मात्र, नंतर हे जारी केलेले परिपत्रकच रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे, अमरनाथ यात्रेबद्दलही अद्यापही सांशकता आहे. सध्या जम्मू काश्मीरमध्ये ४०७ कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी ३५१ रुग्ण काश्मीरमधील आहेत. नियमित कार्यक्रमानुसार १ एप्रिलपासूनच यात्रेसाठी रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुरु होते. यात्रा सुरु होण्याच्या महिनाभरापूर्वीच मार्गावरील बर्फ हटविण्यास सुरुवात होते. मात्र, यंदा अद्यापही मार्गावर बर्फ पडलेला दिसून येत आहे. दरम्यान, गतवर्ष केंद्र सरकारने सुरक्षेचे कारण देत कलम ३७० हटविण्यापूर्वी ३ दिवस अगोदर ऑगस्ट महिन्यात अमरनाथ यात्रा थांबवली होती. तत्पूर्वी जवळपास ३.५ लाख भाविकांनी गुहेत जाऊन दर्शन घेतलं होतं.