"आमचं चुकलं, १५० लोकांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माझी माफी मागितली"
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2023 03:03 PM2023-01-11T15:03:19+5:302023-01-11T15:04:17+5:30
मला एअरपोर्टवरून परत पाठवल्याच्या घटनेवरून एप्रिल २०२२ मध्ये मोदींनी माफी मागितली होती असं धालीवाल म्हणाले
नवी दिल्ली - अमेरिका बेस्ड एनआरआय उद्योगपती आणि प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार विजेते दर्शन सिंह धालीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल मोठा दावा केला आहे. पंतप्रधान मोदींनी १५० लोकांसमोर माझी माफी मागितली आणि आमच्याकडून मोठी चूक झाली असं म्हटल्याचं उद्योगपती दर्शन सिंह धालीवाल यांनी सांगितले आहे.
मला एअरपोर्टवरून परत पाठवल्याच्या घटनेवरून एप्रिल २०२२ मध्ये मोदींनी माफी मागितली होती असं धालीवाल म्हणाले. इंग्रजी वृत्तपत्र द इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा दावा केला आहे. धालीवाल यांनी सांगितले की, पंतप्रधान म्हणाले, आमच्याकडून मोठी चूक झाली, तुम्हाला परत पाठवलं. परंतु तुमचा मोठेपणा आहे जे आमच्या सांगण्यावरून तुम्ही परत आला असं त्यांनी म्हटलं.
राजधानी दिल्ली बॉर्डरवर शेतकरी आंदोलनात लंगर व्यवस्था करण्याच्या आरोपावर दर्शन सिंह धालीवाल यांना २३- २४ ऑक्टोबरच्या रात्री दिल्ली एअरपोर्टवरून बाहेर पाठवले होते. मंगळवारी राष्ट्रपती द्रौपदी मूर्मू यांच्या हस्ते प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार मिळाल्यानंतर धालीवाल यांनी ही मुलाखत दिली. एप्रिल २०२२ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारी निवासस्थानी एका शिख शिष्टमंडळाच्या भेटीवेळी हा संवाद झाला. या बैठकीत जगातील सर्व शिख व्यावसायिकांनी सहभाग घेतला होता. इंजिनिअरींग शिक्षण घेतल्यानंतर १९७२ मध्ये अमेरिकेला गेलेले धालीवाल अमेरिकेत फ्यूल स्टेशन चालवतात.
अधिकाऱ्यांनी दिले होते २ पर्याय
फ्लाईटमधून परत पाठवण्याच्या त्या घटनेचा उल्लेख करत दर्शन सिंह धालीवाल यांनी म्हटलं की, एअरपोर्टवर अधिकाऱ्यांनी मला २ पर्याय दिले होते. पहिला लंगर थांबवा आणि शेतकऱ्यांसोबत मध्यस्थी करा आणि दुसरा पर्याय परत अमेरिकेला जाण्याचा. माणुसकीच्या दृष्टीने मी शेतकरी आंदोलनात माझ्याकडून लंगरची व्यवस्था केली होती. डिसेंबर २०२१ रोजी जेव्हा शेतकरी दिल्ली आले होते तेव्हा मध्यरात्री पाऊस सुरू झाला. मी हा व्हिडिओ पाहिला. थंडीत ते पाण्यात झोपत आहेत. तेव्हा मला त्यांची मदत करावी वाटलं. त्यासाठी मी लंगर आणि राहण्यासाठी टेंटची सोय केली. लोकांच्या हितासाठी मी हे काम केले. त्यात कुठलेही राजकारण नव्हते असं त्यांनी सांगितले.
भारत सरकारने मला परत पाठवण्याचा निर्णय घेतला होता आणि आज नियतीने मला पुन्हा परत बोलावून सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित केला. ही देवाची कृपा आहे. पंजाब सरकारकडून अनेक पुरस्कार मिळालेत. परंतु केंद्र सरकारकडून हा पहिलाच पुरस्कार असल्याचं दर्शन सिंह धालीवाल यांनी म्हटलं.