सपाच्या सोहळ्यात संघर्षाचे दर्शन
By admin | Published: November 6, 2016 01:02 AM2016-11-06T01:02:42+5:302016-11-06T01:02:42+5:30
उत्तर प्रदेशातील सत्ताधारी पार्टीच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यातही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील संघर्ष दिसून आला.
लखनौ : उत्तर प्रदेशातील सत्ताधारी पार्टीच्या रौप्यमहोत्सवी सोहळ्यातही पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शिवपाल यादव आणि मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यातील संघर्ष दिसून आला. शिवपाल यादव यांनी अखिलेश यांच्यावर व्यासपीठावर जाहीरपणे दुगाण्या झाडल्या. शिवपाल यांनी अखिलेशसमर्थक जावेद आबिदी यांना बोलण्यापासून रोखले.
अखिलेश यादव हेच पक्षाचे भवितव्य आहे, असे वक्तव्य आबिदी यांनी भाषणाच्या सुरुवातीला केले. त्यावर संतप्त झालेल्या शिवपाल यांनी उठून त्यांना बाजूला ढकलले. ओमप्रकाश सिंग यांनी आबिदी यांच्याकडून माईक हिसकावून घेतला.
शिवपाल यांनी आपल्या भाषणात अखिलेश यांचा थेट उल्लेख करून म्हटले की, ‘मी आपल्या लोकप्रिय मुख्यमंत्र्यांना सांगू इच्छितो की, तुम्ही मला हाकला अथवा अपमानित करा, मी पक्षासाठी माझे रक्त देत राहीन. मला काही मुख्यमंत्री व्हायचे नाही.’ अखिलेश उत्तरात म्हणाले की, मी कुठल्याही परीक्षेसाठी तयार आहे. (वृत्तसंस्था)
ऐक्याचे आवाहन : मुलायमसिंग यादव यांनी आपल्या परिवाराच्या ऐक्याऐवजी ‘जनता परिवारा’च्या ऐक्यावर जोर दिला. त्यांनी सांगितले की, आज सपाचा स्थापना दिवस आहे. मी जनता परिवारातील सर्व मान्यवर नेत्यांना येथे उगाच बोलावलेले नाही. देशाच्या हितासाठी आपण सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे. आता पुन्हा संघर्ष करायची गरज निर्माण झाली आहे.
भाजपाला हाकलून लावू
आम्ही बिहारमधून भाजपला हाकलून लावले. आता उत्तर प्रदेशातूनही हाकलून लावू, असे प्रतिपादन राष्ट्रीय जनता दलाचे (राजद) प्रमुख लालूप्रसाद यादव यांनी केले. माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी समाजवादी परिवाराला एक होण्याचे आवाहन केले. शरद यादव यांनी सांगितले की, तूर्त तरी आघाडीची चर्चा नाही. मुलायमसिंग यादवच याबाबत योग्य प्रकारे सांगू शकतील. रालोदप्रमुख अजित सिंग, लोकदलाचे नेते अभय चौटाला, अॅड राम जेठमलानी हेही व्यासपीठावर होते.