'डाटाचा गैरवापर खपवून घेणार नाही'
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 12:11 AM2018-09-19T00:11:15+5:302018-09-19T00:22:29+5:30
रविशंकर प्रसाद यांचा इशारा; देशात डाटा विश्लेषणाचे आगार बनवण्याचे प्रयत्न
नवी दिल्ली : भारताला डाटा विश्लेषणाचे आगार बनविण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे; परंतु लोकशाही प्रक्रियेवर प्रभाव टाकण्यासाठी डाटाचा गैरवापर अजिबात खपवून घेणार नाही, असा इशारा आयटी व कायदामंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिला.
सीबीआयने फेसबुक, केम्ब्रिज अॅनालिटिका व ग्लोबल सायन्स रिसर्च या संस्थांना पत्र लिहून डाटा संकलन व्यवस्थेची माहिती मागितली.
या पार्श्वभूमीवर प्रसाद यांनी हा इशारा दिला आहे. ते म्हणाले की, भारत डाटा विश्लेषण क्षेत्रातील एक प्रमुख केंद्र बनावे यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. परंतु या डाटाचा वापर लोकशाहीवर प्रभाव टाकण्यासाठी कंपन्या करीत असतील तर ते खपवून घेतले जाणार नाही. स्वच्छता अभियानातील एका कार्यक्रमात प्रसाद म्हणाले की डाटा फुटीप्रकरणी फेसबुकने याआधीच माफी मागून सुधार कृती करण्याचे आश्वासन दिले आहे. केम्ब्रिज अॅनालिटिकाने सुरुवातीला उत्तर दिले होते, नंतर मात्र कंपनीकडून काहीही प्रतिसाद नाही. त्यामुळे हे प्रकरण आम्ही तपासासाठी सीबीआयकडे पाठविले आहे.
मागवला खुलासा
वर्षाच्या सुरुवातीला ८७ लाख वापरकर्त्यांचा डाटा फुटल्याप्रकरणी फेसबुक व केम्ब्रिज अॅनालिटिकाविरुद्ध क्षोभ निर्माण झाला होता. जगभरातील सरकारांकडून याबाबत कंपन्यांवर टीकेची झोड उठली होती.
फेसबुक युजर्सचा डाटा अनेक देशांतील निवडणुकांसाठी वापरण्यात आल्याचा आरोप आहे. सावध झालेल्या भारत सरकारने दोन्ही कंपन्यांना नोटिसा बजावलेल्या होत्या. सीबीआयनेही आता या कंपन्यांकडून त्यांचे म्हणणे मागविले आहे.