दत्त मंदिर चोरीप्रकरणात चोरट्यास मुद्देमालासह अटक
By admin | Published: July 23, 2016 12:00 AM2016-07-23T00:00:02+5:302016-07-23T00:00:02+5:30
येथील अत्यंत वर्दळीच्या दत्त चौकातील दत्त मंदिरातील चोरी प्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी चोरट्याला यवतमाळ नजीकच्या भोयर येथून अटक केली.
भोयर येथे कारवाई : वडगाव रोड पोलीस
यवतमाळ : येथील अत्यंत वर्दळीच्या दत्त चौकातील दत्त मंदिरातील चोरी प्रकरणी वडगाव रोड पोलिसांनी चोरट्याला यवतमाळ नजीकच्या भोयर येथून अटक केली. त्याच्याजवळून मुद्देमाल जप्त केला. मंगळवारी पहाटे या मंदिरातून चोरट्याने मूर्तीचा मुकुट, छत्र असा ५० हजाराचा मुद्देमाल लंपास केला होता.
सुनील ज्ञानेश्वर पवार (३७) रा. गणेशपेठ नागपूर हल्ली रा. यवतमाळानजीकचे भोयर शिवार असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. दत्त मंदिरात चोरी झाल्यानंतर पोलिसांनी तपास जारी केला असता सुनीलने चोरी केल्याचे उघडकीस आले. सुनीलवर नागपूर येथे गणेशपेठ पोलीस स्टेशनमध्ये शरीर दुखापतीचे गंभीर गुन्हे दाखल आहे. त्यामुळे याला नागपूर पोलिसांनी तडीपार केले आहे. सुनील हा भोयर येथे अतिक्रमित जागेत झोपडी बांधून राहात होता. त्याने बुधवारी रात्री दत्त मंदिरातील चांदीचा मुकुट, छत्र, मूर्ती, घंटा, समई, दोन शंख चोरून नेले होते. या घटनेने खळबळ निर्माण झाली होती.
या गुन्ह्याचा तपास शोध पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत गीते, गजानन धात्रक, बंडू मेश्राम, गौरव नागलकर, रावसाहेब शेंडे, आशीष चौबे, रूपेश लामाटे, इकबाल शेख यांनी केला. जिल्हा पोलीस अधीक्षक अखिलेशकुमार सिंग, अपर पोलीस अधीक्षक डॉ.काकासाहेब डोळे, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने, पोलीस निरीक्षक देवीदास ढोले यांनी मार्गदर्शन केले. (कार्यालय प्रतिनिधी)