खट्टा मीठा तीखा! भाऊनं तब्बल ४ हजार पाणीपुरी फुकटात दिल्या, कारण ऐकून सर्वच करताहेत कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: November 24, 2022 08:39 AM2022-11-24T08:39:15+5:302022-11-24T08:41:19+5:30
मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये एका पाणीपुरीवाल्यानं चक्क ४ हजार पाणीपुरी फुकटात वाटल्या. यामागचं कारण ऐकून तुम्हीही पाणीपुरीवाल्याचं कौतुक कराल.
छिंदवाडा-
मध्य प्रदेशच्या छिंदवाडामध्ये एका पाणीपुरीवाल्यानं चक्क ४ हजार पाणीपुरी फुकटात वाटल्या. यामागचं कारण ऐकून तुम्हीही पाणीपुरीवाल्याचं कौतुक कराल. संजीत चंद्रवंशी याच्या घरी सोनपावलांनी चिमुकलीचं आगमन झालं. कन्यारत्न प्राप्त झाल्यानं संजीत यांनी आपला आनंद अनोख्या पद्धतीनं साजरा केला आणि पाणीपुरी फुकटात खाऊ घातली.
संजीत यांनी आपल्या स्टॉलवर 'फ्री पाणीपुरी' असे पोस्टर लावून पाणीपुरी फुटकात देणं सुरू केलं. बघता बघता स्टॉलवर गर्दी झाली आणि शेकडो लोकांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला. तसंच संजीत यांचं अभिनंदन देखील केलं. अगदी लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी पाणीपुरीचा आस्वाद घेतला आणि संजीत यांचं कौतुकही केलं.
छिंदवाडाचे रहिवासी असलेले संजीत चंद्रवंशी हे दररोज पोला ग्राऊंडजवळच पाणीपुरीचा स्टॉल लावतात. दररोज ते जवळपास २ हजार पाणीपुरी विकतात. पण मुलगी झाल्याच्या आनंदात संजीत यांनी त्या दिवशी तब्बल ४ हजार पाणीपुरी विकल्या आणि त्याही अगदी मोफत. चंद्रवंशी यांना तीन भाऊ आहेत. पण गेल्या १० वर्षात त्यांच्या कुटुंबात कुणालाच कन्यारत्न प्राप्त झालं नव्हतं. आता संजीत यांच्या पत्नी गर्भवती होत्या आणि त्यांना कन्यारत्न प्राप्त झाल्याचं कळताच आनंद गगनात मावेनासा झाला. मुलगी झाल्याच्या आनंदात त्यांनी पाणीपुरी फुकट वाटणं सुरू केलं. बघता बघता लोकांनीही ४ हजार पाणीपुरी फस्त केल्या.
"सध्याच्या जगात मुली म्हणजे ओझं समजल्या जातात. पण पाणीपुरीवाल्या भाऊंनी मुलगी झाली म्हणून चक्क पाणीपुरी फुकटात वाटल्या. ही अतिशय अभिमानाची गोष्ट आहे. यामुळे समाजात लोकांच्या मनात मुलीबद्दलचा आदर वाढेल. तसंच पाणीपुरी खाणारा आज प्रत्येक व्यक्ती संजीत यांना भरभरुन आशीर्वाद देत असेल", असं पाणीपुरीचा आस्वाद घेणाऱ्या आरती साहू नावाच्या विद्यार्थीनीनं म्हटलं.