मुलाने कमी हुंडा दिल्याने मुलीने विवाह मोडला; वधू म्हणाली, नवरदेवाची ऐपत नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2023 06:23 AM2023-03-12T06:23:44+5:302023-03-12T06:25:46+5:30
मूळात त्या मुलीला या मुलाशी विवाह करायचा नव्हता.
हैदराबाद: हुंड्यामुळे वरपक्षाच्या लोकांनी वधूचा खूप छळ केल्याच्या कहाण्या नेहमी ऐकायला येतात. हैदराबादमध्ये मात्र मुलाने कमी हुंडा दिल्यामुळे एका मुलीने त्याच्याशी विवाह करण्यास नकार दिला. तेलंगणातील एका आदिवासी जमातीत वधू नव्हे, तर वराला हुंडा द्यावा लागतो.
मुलीने मागितलेला २ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेचा हुंडा देण्यास मुलाने नकार दिला. मात्र काही दिवसांनी तो राजी झाला. विवाहाचा दिवस उजाडला. मंडपात वरपक्षाचे सारे लोक हजर झाले. मुलगा आपली भावी पत्नी विवाहस्थळी कधी येते, याची वाट पाहात होता. पण बराच वेळ झाला ती व वधू पक्षाचे लोक आलेच नाहीत. मी मागते आहे तेवढा हुंडा देण्याची होऊ घातलेल्या नवऱ्याची ऐपत नाही, असे कारण देऊन मुलीने हा विवाह मोडला.
मुळात त्या मुलीला आपल्याला सांगून आलेल्या या मुलाशी विवाह करायचा नव्हता. घरच्या मंडळींनी खूपच आग्रह केल्याने अखेर ती या मुलाशी बोलायला राजी झाली. तिने जाणुनबूजून या मुलाकडे २ लाख रुपयांहून अधिक रकमेचा हुंडा मागितला होता. (वृत्तसंस्था)
- इतकी मोठी रक्कम ऐकून हा मुलगा काढता पाय घेईल, असे मुलीने वाटले होते.
- पण बरोबर उलटे घडले. मागितलेला हुंडा देण्यास तो मुलगा तयार झाला.
तोडगा काढण्यासाठी पोलिसांचा हस्तक्षेप
- आता मुलीसमोर मोठे संकट उभे राहिले. तिने हुंड्याचे कारण सांगून हा विवाह मोडला. ती विवाह मंडपात न आल्याने संतप्त झालेल्या वरपक्षाच्या मंडळींनी पोलिसांत धाव घेतली. त्यावेळी पोलिसांनी मुलीला बोलावून घेतले.
- दोन्ही बाजूच्या लोकांमध्ये चर्चा घडवून आणली. त्यानंतर परस्पर संमतीने हा विवाह मोडण्याचे ठरविले. अशा रितीने या प्रकरणावर तोडगा निघाल्यानंतर पोलिसांनी कोणाविरोधात तक्रार दाखल करून घेतली नाही.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"