वडिलांचा जीव वाचविण्यासाठी धावून आली लेक; लालूप्रसाद यादवांना मुलीने दिली किडनी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2022 08:07 AM2022-12-06T08:07:27+5:302022-12-06T08:07:42+5:30
दोघांची प्रकृती उत्तम, लालूंचे धाकटे पुत्र व उपमुख्यमंत्री तेजस्वी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे.
पाटणा : राजदप्रमुख लालूप्रसाद यादव यांचे सिंगापूर येथील रुग्णालयात सोमवारी किडनी प्रत्यारोपण यशस्वी झाले. मुलगी रोहिणीने लालूंना किडनी दान केली. लालूंच्या आधी रोहिणीवर शस्त्रक्रिया करण्यात आली. दोघांनाही अतिदक्षता कक्षात हलवण्यात आले असून, दोघांचीही प्रकृती उत्तम आहे. रोहिणीने याआधीच प्राथमिक वैद्यकीय चाचणी उत्तीर्ण केली आहे. तिची किडनी सध्या ९० ते ९५ टक्के काम करीत आहे. लालूंच्या दोन्ही किडनी २८ टक्के काम करीत आहेत. प्रत्यारोपणानंतर त्या जवळपास ७० टक्के काम करू लागतील. आरोग्याच्या दृष्टीने एवढे पुरेसे मानले जाते.
लालूंचे धाकटे पुत्र व उपमुख्यमंत्री तेजस्वी यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. वडिलांची किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया यशस्वी झाली आहे. वडील शुद्धीवर असून, बोलत आहेत. शुभेच्छांबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार, असे तेजस्वी यांनी म्हटले आहे. मीसा भारतीनेही सोशल मीडियावर लिहिले की, वडील ठीक आहेत.
‘तुमचे आरोग्य चांगले असणे हेच माझे जीवन’
शस्त्रक्रियेपूर्वी रोहिणीने लालूंसोबतचा एक फोटो ट्वीट करून लिहिले की, रॉक अँड रोल करण्यासाठी तयार. माझ्यासाठी हे पुरेसे आहे. तुमचे आरोग्य चांगले असणे हेच जीवन आहे. शस्त्रक्रियेची प्रक्रिया ३ डिसेंबरपासून सुरू झाली होती. ही प्रक्रिया सुरू होण्याआधीही रोहिणीने ट्वीटवर भावनिक संदेश लिहिला होता. त्यात तिने म्हटले होते की, आम्ही ईश्वर पाहिलेला नाही. मात्र, आमच्या वडिलांमध्येच ईश्वराचे रूप पाहिले आहे.