मुलगी लंडनमध्ये खासदार...कोण आहे शेख रेहाना?; ज्यांच्यासोबत भारतात आहेत शेख हसीना
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2024 05:50 PM2024-08-06T17:50:40+5:302024-08-06T17:51:28+5:30
बांगलादेशात हिंसक आंदोलन भडकल्यानंतर आंदोलनकर्ते थेट पंतप्रधानांच्या निवासस्थानी घुसले. तत्पूर्वी शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा देत भारतात दाखल झाल्या.
नवी दिल्ली - बांगलादेशात सत्तापालट झाल्यानंतर शेख हसीना बांगलादेश सोडून भारतात आल्या. शेख हसीना काही काळ भारतात राहून लंडन किंवा फिनलँडला जाऊ शकतात असं बोललं जातं. शेख हसीना यांच्यासोबत त्यांची बहीण शेख रेहाना यादेखील आहेत. बहिणीसोबत शेख हसीना या लंडनमध्ये शरण जाण्याच्या तयारीत आहेत. परंतु शेख हसीना यांची बहीण कोण आणि त्यांच्या कुटुंबाचं राजकारणात किती योगदान आहे? त्यांचे लंडनशी कनेक्शन काय असे विविध प्रश्न अनेकांना पडले असतील तर याबाबतच जाणून घेऊया.
कोण आहे शेख रेहाना?
शेख रेहाना, या शेख हसीना यांची छोटी बहीण आहे. शेख हसीना यांच्या कुटुंबात अनेक सदस्य होते परंतु १९७५ साली त्या सर्वांची हत्या करण्यात आली होती. १९७५ मध्ये बांगलादेशात असाच काही उद्रेक घडला होता तेव्हा शेख हसीना यांचे वडील शेख मुजीबुर रहमान, आई आणि ३ मुलींची हत्या करण्यात आली होती. त्यावेळी शेख हसीना बांगलादेशात नव्हत्या. त्यांचे पती वाजिद मिया आणि छोटी बहीण रेहानासोबत त्या जर्मनीत होत्या. त्यामुळे या दोन्ही बहिणींचा जीव वाचला.
रेहाना यांचा जन्म १३ सप्टेंबर १९५५ साली झाला. त्या बांगलादेशचे राष्ट्रपिता असणारे शेख मुजीबुर रहमान यांच्या कुटुंबातील सर्वात छोटी मुलगी आहे. शेख रेहाना यांचं सुरुवातीचं शिक्षण शाहीन स्कूलमध्ये झालं. १९७१ साली जेव्हा बांगलादेशात मुक्तीसंग्राम सुरू होतं तेव्हा पाकिस्तानी फौजेने शेख रेहाना यांनाही नजरकैद केले होते. १९७५ साली त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांची हत्या झाल्यानंतर त्या जर्मनीतून भारतात आल्या. त्यावेळी जवळपास दोन्ही बहिणी ६ वर्ष भारतात राहिल्या. त्यानंतर बांगलादेशात गेल्या. रेहाना कुटुंबातील राजकीय पक्षात सक्रीय नाहीत परंतु पडद्यामागून त्यांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे.
शेख रेहाना यांनी १९७५ साली त्यांच्या वडिलांच्या हत्येचा मुद्दा जागतिक स्तरावर अनेकदा उचलला. १९७९ मध्ये स्वीडनच्या स्टॉकहोममध्ये एका आंतरराष्ट्रीय संमेलनात आरोपींविरोधात कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. १० मे १९७९ साली त्यांनी ऑल युरोपीय बकशाल संमेलनात असं भाषण दिलं ज्यामुळे त्यांना जागतिक ओळख मिळाली. या संमेलनात युरोपीय देशातील प्रमुख, संयुक्त राष्ट्राचे प्रमुख आणि आंतरराष्ट्रीय एनजीओचे अनेक ज्येष्ठ सदस्य होते.
कुटुंबात कोण कोण आहे?
शेख रेहाना यांचे लग्न शफीक सिद्धिकी यांच्याशी झालं. ज्यांचे शिक्षण क्षेत्रात महत्त्वाचं योगदान मानलं जाते. शफीक सिद्धिकी ढाका यूनिवर्सिटीत प्रोफेसर राहिलेत. रेहाना यांना ३ मुले आहेत. एक मुलगा आणि २ मुली. त्यांच्या मुलाचं नाव रादवान सिद्धिकी, मुलगी तुलीप आणि अजमीना सिद्धिकी अशी नावे आहेत. रादवान ढाकाच्या एका आंतरराष्ट्रीय संस्थेत काम करतात. त्यासोबत आवामी लीगच्या रिसर्च इन्सिट्यूटमध्ये त्यांचे योगदान आहे. मोठी मुलगी तुलीप सिद्धिकी ब्रिटीश संसदेची सदस्या आहे. त्याशिवाय आणखी एक मुलगी कंट्रोल रिस्क्समध्ये ग्लोबर रिस्क एनालिसिस एडिटर या पदावर आहे.