हृदयद्रावक! घरी वडिलांचा मृतदेह, पाणावलेले डोळे अन् थरथरत्या हातांनी बोर्डाच्या परीक्षेला बसली लेक

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2023 06:07 PM2023-03-17T18:07:20+5:302023-03-17T18:08:41+5:30

वडिलांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला, सर्व सदस्य ढसाढसा रडत होते पण वडिलांची स्वप्नं पूर्ण करण्याचा निर्धार मौसमीने केला.

daughter sits board exam leaving fathers body at home | हृदयद्रावक! घरी वडिलांचा मृतदेह, पाणावलेले डोळे अन् थरथरत्या हातांनी बोर्डाच्या परीक्षेला बसली लेक

हृदयद्रावक! घरी वडिलांचा मृतदेह, पाणावलेले डोळे अन् थरथरत्या हातांनी बोर्डाच्या परीक्षेला बसली लेक

googlenewsNext

डोळ्यात अश्रू, थरथर कापणारे हात आणि वडिलांचं स्वप्न... अशीच काहीशी अवस्था बारावी बोर्डाच्या परीक्षेला बसलेल्या मुलीची झाली. ज्या वडिलांनी खांद्यावर बसवून जग दाखवलं, बोट धरून योग्य मार्ग दाखवला, नेहमी पुढे जाण्याचा विचार करणारे वडील आज नाहीत हे समजल्यावर मुलीवर दु:खाचा डोंगर कोसळला. घरामध्ये वडिलांचा मृतदेह असताना ती परीक्षेला गेली. त्यानंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. 

मिळालेल्या माहितीनुसार, अष्टम दलुई (40) हे बीरभूम जिल्ह्यातील बोलपूर नगरपालिकेच्या मकरमपूर, प्रभाग क्रमांक 10 येथील रहिवासी होते. बुधवारी पहाटे चार वाजता ब्रेन स्ट्रोकने त्यांचे निधन झाले. सकाळी त्यांना मृत घोषित करण्यात आले. त्यांच्या मागे पत्नी आणि दोन मुली आहेत. त्यांचे बोलपूर नेताजी बाजार येथे चहाचे दुकान असून ते कुटुंबाच्या उत्पन्नाचे एकमेव साधन होते. त्यांची मोठी मुलगी मौसमी दलुई ही पारुलडांगा शिक्षणनिकेतन आश्रम शाळेत बारावीची विद्यार्थिनी आहे.

सध्या पश्चिम बंगालमध्ये बारावीची उच्च माध्यमिक बोर्डाची परीक्षा सुरू आहे. इंग्रजीचा पेपर होणार होता, मात्र सकाळीच मौसमीच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. वडिलांच्या आकस्मिक निधनाने कुटुंबाला मोठा धक्का बसला, सर्व सदस्य ढसाढसा रडत होते पण वडिलांची स्वप्नं पूर्ण करण्याचा निर्धार मौसमीने केला. तिने मन बळकट करून परीक्षेला बसण्याची इच्छा व्यक्त केली. शेजाऱ्यांच्या मदतीने वेळेवर परीक्षा केंद्रावर पोहोचली आणि पेपर दिला.

स्मशानभूमीत वडिलांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यासाठी कुटुंबीय व शेजारी मौसमीची वाट पाहत होते. परीक्षा संपताच मौसमी हिने जलघाट गाठून वडिलांचे अंत्यसंस्कार केले. अजून काही विषयांच्या परीक्षा बाकी असून ती सर्व पेपर देणार असल्याचे तिने सांगितले. ती म्हणाली, "माझ्या वडिलांना यापूर्वी दोनदा ब्रेन स्ट्रोकचा त्रास झाला होता. तिसर्‍यांदा त्यांचा मृत्यू झाला. माझ्या आयुष्यातील सर्वात मोठ्या परीक्षेत मी चांगले मार्क मिळवावे अशी त्यांची नेहमीच इच्छा होती. म्हणून मी परीक्षेला बसले." एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: daughter sits board exam leaving fathers body at home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :examपरीक्षा