दुरान्तो एक्स्प्रेसच्या ड्रायव्हरांचा सत्कार; शेकडो प्रवाशांचे दोघांनी वाचविले प्राण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2017 12:58 AM2017-09-03T00:58:06+5:302017-09-03T00:58:29+5:30
मध्य रेल्वेवर वाशिंद व आसनगाव दरम्यान पावसाने दरड कोसळल्याने २९ आॅगस्ट रोजी सकाळी नागपूरहून मुंबईकडे येत असलेल्या दुरान्तो एक्स्प्रेसचे इंजिन व नऊ डबे रुळांवरून घसरूनही प्रसंगावधान राखून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविल्याबद्दल रेल्वे बोर्डाने दोन्ही ड्रायव्हरचा शनिवारी सत्कार केला.
नवी दिल्ली : मध्य रेल्वेवर वाशिंद व आसनगाव दरम्यान पावसाने दरड कोसळल्याने २९ आॅगस्ट रोजी सकाळी नागपूरहून मुंबईकडे येत असलेल्या दुरान्तो एक्स्प्रेसचे इंजिन व नऊ डबे रुळांवरून घसरूनही प्रसंगावधान राखून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविल्याबद्दल रेल्वे बोर्डाने दोन्ही ड्रायव्हरचा शनिवारी सत्कार केला.
१० दिवसांत चार गाड्या रुळांवरून घसरल्यानंतर टीका होत असताना, रेल्वेने या दोन कर्तव्यदक्ष कर्मचाºयांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली. ‘दुरान्तो’चे ड्रायव्हर वीरेंद्र सिंग (५२ वर्षे) व सहाय्यक ड्रायव्हर अभय कुमार पाल (३२) यांचा रेल्वे बार्डाचे अध्यक्ष अश्विनी लोहाणी यांनी प्रशस्तिपत्र व अनुक्रमे १० हजार व पाच हजार रुपयांचे रोख पारितोषिक देऊन गौरव केला. हे दोघेही मध्य रेल्वेचे कर्मचारी आहेत. या दोघांनी प्रामाणिकपणा, कर्तव्यदक्षता व प्रसंगावधान राखून ते खरे ‘रेल्वेमन’ असल्याची प्रचिती दिली, असे लोहाणी म्हणाले.
रेल्वच्या प्रशस्तिपत्रात नमूद केले गेले की, मोठे वळण व मुसळधार पाऊस, यामुळे रुळांवर दरड कोसळल्याचे ऐनवेळी लक्षात येताच या दोघांनी इमर्जन्सी ब्रेक लावले. परिणामी, रुळांवर कोसळलेल्या दगड-मातीवर गाडी येऊन आपटली, तेव्हा तिचा वेग खूपच कमी झाला होता. अचानक ब्रेकमुळे इंजिन व नऊ डबे घसरले, पण मोठा अनर्थ टळला. तशा आणीबाणीच्या वेळीही कुमार व पाल यांनी मन शांत ठेवून नियंत्रण कक्षाशी लगेच संपर्क साधला आणि अप आणि डाउन या दोन्ही मार्गांवरील वीजपुरवठा तत्काळ बंद करायला लावला. त्यामुळेही अपघाताचा संभाव्य धोका कमी झाला.