दाऊद करणार होता आत्मसमर्पण
By admin | Published: May 3, 2015 06:09 AM2015-05-03T06:09:57+5:302015-05-03T06:09:57+5:30
मुंबईतील १९९३ सालच्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आत्मसमर्पण करण्यास तयार झाला होता, पण सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास नकार दिला,
नवी दिल्ली : मुंबईतील १९९३ सालच्या बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम आत्मसमर्पण करण्यास तयार झाला होता, पण सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यास नकार दिला, असा सनसनाटी दावा केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाचे (सीबीआय) तत्कालीन उपमहानिरीक्षक नीरजकुमार यांनी केला. मात्र, त्यांच्या या वादग्रस्त वक्तव्यावर चहुबाजुंनी टीका झाल्यानंतर त्यांनी वक्तव्य मागे घेतले.
मुंबईतील बॉम्बस्फोट मालिकेनंतर दीड वर्षाने दाऊदने आत्मसमर्पणाचा प्रस्ताव दिला होता, असा दावा करून नीरजकुमार म्हणाले, जून १९९४ मध्ये त्यांचे तीनदा दाऊदशी बोलणे झाले होते. आत्मसमर्पणाची कल्पना दाऊदच्या मनात होती. परंतु आत्मसमर्पणानंतर विरोधक आपला जीव घेतील, असे भय त्याला वाटत होते. यावर तुझे संरक्षण करणे ही सीबीआयची जबाबदारी आहे अशी ग्वाही आपण त्याला दिली होती. मात्र बोलणी पुढल्या टप्प्यात जाण्यापूर्वीच सीबीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांना रोखले. नीरजकुमार यांच्या या वक्तव्याने प्रचंड खळबळ उडाली. जुलै २०१३ साली दिल्लीचे पोलीस आयुक्त म्हणून सेवानिवृत्त झालेले कुमार १२ मार्च १९९३ रोजी मुंबईत एकापाठोपाठ एक झालेल्या १२ बॉम्बस्फोटांची चौकशी करणाऱ्या सीबीआय चमूचे प्रमुख होते. नीरजकुमार यांनी आपले वक्तव्य काही तासातच मागे घेतले. ते म्हणाले, माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला. दाऊद आत्मसमर्पण करणार होता असे मी बोललोच नाही.
नीरजकुमार यांचा दावा सीबीआयचे तत्कालीन महासंचालक के. विजय रामाराव यांनी फेटाळला आहे. दाऊद आत्मसमर्पण करणार होता, या वृत्तात काहीएक तथ्य नाही. परंतु तो नीरजकुमार यांच्या संपर्कात होता काय, याबाबत आपल्याला माहिती नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.