दाऊद करणार होता आत्मसमर्पण - नीरज कुमार यांचा गौप्यस्फोट
By Admin | Published: May 2, 2015 11:45 AM2015-05-02T11:45:38+5:302015-05-02T19:06:16+5:30
मुंबईतील १९९३ च्या साखळी बाँबस्फोटांचा सूत्रधार आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा आत्मसमर्पण करण्यास तयार होता,असा गौप्यस्फोट सीबीआयचे माजी महानिरीक्षक नीरज कुमार यांनी केला आहे.
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २ - मुंबईतील १९९३ च्या साखळी बाँबस्फोटांचा सूत्रधार आणि अडंरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम हा आत्मसमर्पणण करण्यास तयार होता, त्यासाठी त्याने ती वेळा सीबीआयशी संपर्कही केला होता, असा गौप्यस्फोट सीबीआयचे माजी महानिरीक्षक व दिल्लीचे माजी पोलिस आयुक्त नीरज कुमार यांनी केला आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत कुमार यांनी हा दावा केला असून सीबीआयच्या वरिष्ठ अधिका-यांनी नकार दिल्यामुळे दाऊदशी बोलणी फिस्कटली असेही त्यांनी म्हटले आहे.
मुंबईत १२ मार्च १९९३ रोजी झालेल्या साखळी बाँबस्फोट या प्रकरणाचा नीरज कुमार तपास करत होते. याप्रकरणातील मुख्य आरोपी असलेल्या दाऊदनने जून १९९४मध्ये आत्मसमर्पण करण्याची तयारी दर्शवली होती, त्यासंदर्भात त्याच्याशी तीनवेळा चर्चाही झाली होती. मात्र सीबीआयने दाऊदच्या आत्मसमर्पणाला नकार दिला आणि बोलणी फिस्कटली, नाहीतर आज दाऊद मोकाट फिरत नसता असे कुमार यांनी सांगितले. 'दाऊद याप्रकरणी प्रत्येक आरोपाचे उत्तर देण्यास तयार होता, मात्र भारतात आल्यानंतर इतर शत्रू आपला खात्मा करतील अशी भीती त्याला वाटत होती. तसेच शरण आल्यावर पलिसांकडून छळ होण्याची चिंताही त्याला सतावत होती' असे कुमार यांनी सांगितले. 'सीबीआय त्याच्या सुरक्षेची पूर्ण जबाबादारी घेईल' असे आश्वासन आपण दाऊदला दिल्याचेही कुमार यांनी सांगितले. मात्र सीबीआयच्या वरिष्ठ अधिका-यांनी आपल्याला थांबवले आणि पुढील बोलणी होऊ शकली नाहीत, असे कुमार म्हणाले.
दरम्यान नीरज कुमार यांच्यापूर्वी ज्येष्ठ कायदेतज्ञ राम जेठमलानी यांनीही दाऊदने आपल्याला फोन केला होता व शरण येण्याबद्दल त्याचे व आपले बोलणे झाले होते, असा दावा केला होता.