दाऊदचा हस्तक जावेद चिकना कराचीमध्ये चालवतोय रेस्टॉरंट

By admin | Published: May 18, 2016 12:08 PM2016-05-18T12:08:31+5:302016-05-18T12:08:31+5:30

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीचा हस्तक दाऊदभाई पटेल उर्फ जावेद चिकनाचं कराचीमध्ये फास्ट फूड रेस्टॉरंट असल्याची माहिती समोर आली आहे

David's handkerchief is running smoothly in Karachi | दाऊदचा हस्तक जावेद चिकना कराचीमध्ये चालवतोय रेस्टॉरंट

दाऊदचा हस्तक जावेद चिकना कराचीमध्ये चालवतोय रेस्टॉरंट

Next
ऑनलाइन लोकमत - 
नवी दिल्ली, दि. 18 - अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमच्या डी कंपनीचा हस्तक दाऊदभाई पटेल उर्फ जावेद चिकनाचं कराचीमध्ये फास्ट फूड रेस्टॉरंट असल्याची माहिती समोर आली आहे. राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) भारुच डबल मर्डर प्रकरणी दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये ही माहिती दिली आहे. कॅफे इक्विनोस्क असं या रेस्टॉरंटचं नाव असून दाऊदभाई पटेलचा मुलगा हे रेस्टॉरंट चालवत असल्याचं एनआयएने सांगितलं आहे.
 
एनआयएने चार्जशीटमध्ये जावेद चिकनाचं नाव वॉण्टेड लिस्टमध्ये टाकलं आहे. सोबतच पाकिस्तानातील त्याचे दोन पत्तेदेखील देण्यात आले आहेत. यामध्ये कराचीमधील बाघ इबने कासीम, क्लिफ्टन परिसरातील टॉवरमध्ये राहत असल्याचा दावा करण्यात आला आहे. विशेष म्हणजे क्लिफ्टन परिसरात जावेदच्या बॉसेसचे आणि दाऊद इब्राहिमचं घर आहे. 
 
जावेद चिकनावर चार जणांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप आहे. यामध्ये शिरीष भाई बंगाली, अॅडव्होकेट मोदी, विरल देसाई आणि जयकर महाराज यांचा समावेश आहे. झहीदमिया उर्फ जाओ हादेखील या कटात सामील होता. समाजातील काही विशिष्ट लोकांनाच यावेळी टार्गेट करण्यात आलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि भाजपाची पार्श्वभुमी असणा-यांना तसंच 2002 गुजरात दंगलीत सहभागी असणारे आणि मुस्लिमविरोधी व्यक्तींना टार्गेट करण्यात आलं होतं.
 
जावेद चिकनाप्रमाणे इतरांनाही पाकिस्तानची गुप्तचर संस्था (आयएसआय) आश्रय देत असून भारतामध्ये दहशतवादी कारवाया करण्यासाठी मदत करत असल्याची माहिती एनआयएच्या अधिका-याने दिली आहे. कराचीमध्ये रेस्टॉरंट सुरु करणे यामागील नेमकं उद्दिष्ट अजून स्पष्ट झालेलं नाही. पैसे कमावण्यासाठी हे रेस्टॉरंट चालवण्यात येत आहे की अंडरवर्ल्डचं काम करण्याच्या बहाण्याने हे रेस्टॉरंट सुरु आहे याचा तपास सुरु आहे असंही एनआयएच्या अधिका-याने सांगितलं आहे.
 
भारुचमधील हत्याकांडासाठी जावेद चिकनाने दोनवेळा शस्त्रपुरवठा केला असल्याची माहिती चार्जशीटमध्ये देण्यात आली आहे. पहिल्या वेळी मुंबई आणि नंतर सुरतमध्ये हा शस्त्रपुरवठा करण्यात आला. पहिल्यावेळी पाठवण्यात आलेल्या शस्त्रांमध्ये दोष आढळल्याने पुन्हा सुरतमार्गे शस्त्रपुरवठा करण्यात आला. सौदी अरेबियामधील पाकिस्तानी नागरिक अशफाक अन्सारी याच्यामार्फत ही डिलिव्हरी करण्यात आली. 
 
हत्येसाठी जावेद चिकनाने हवालामार्गे 5 लाख रुपयांची देखील व्यवस्था केली होती. मुंबईतील एजंटमार्फेत हे पैसे हैदर अलीकडे पाठवण्यात आले. 
भाजपा आणि संघाच्या नेत्यांची हिटलिस्ट -
देशामध्ये सामाजिक अस्थिरता निर्माण व्हावी, जातीय तणाव वाढावा यासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नेते तसंच चर्चेवर हल्ले करण्याचा कट भारताचा मोस्ट वाँटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमच्या 'डी कंपनी'ने आखला होता असा दावा राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) केला आहे. डी कंपनीने सामाजिक अस्थिरता निर्माण व्हावी यासाठी आपल्या 10 लोकांवर ही जबाबदारी सोपवली होती. धार्मिक नेत्यांसोबतच संघाचे नेते आणि चर्चेवर  हल्ले करण्याचे आदेश त्यांना देण्यात आले होते. महत्वाचं म्हणजे 2014मध्ये केंद्रात मोदी सरकार सत्तेत आल्यानंतर ही कट रचण्यात आला होता. डी कंपनीचे सदस्य पाकिस्तानमधील जावेद चिकना आणि दक्षिण अफ्रिकेतील झाहीद मियान उर्फ जाओ या हत्येचे मास्टरमाइंड असल्याचं समोर आलं आहे. 
 
डी कंपनीच्या 10 जणांविरोधात चार्जशीट -
एनआयए आपल्या चार्जशीटमध्ये डी कंपनीच्या 10 जणांची नाव देणार आहे ज्यामध्ये गेल्यावर्षी अटक करण्यात आलेल्या सात जणांचा समावेश आहे. हाजी पटेल, मोहम्मद युनूस शेख, अब्दुल समाद, अबिद पटेल, मोहम्मद अलताफ, मोहसीन खान आणि निसार अहमद अशी त्यांची नावे आहेत. अबिद पटेल हा जावेद चिकनाचा भाऊ असून शिरीष बंगाली आणि प्रग्नेश मिस्त्री याच्या हत्येसाठी त्याला 50 लाख रुपये देण्यात आले होते. 
भारुच डबल मर्डर -
शिरीष बंगाली आणि प्रग्नेश मिस्त्री यांची हत्या याच कटाचा भाग होता. गुजरातमधील भारुच येथे 2 नोव्हेंबर 2015 ला ही हत्या करण्यात आली होती. डी कंपनीच्या शार्प शुटर्सने ही कामगिरी पुर्ण केली होती. या शार्प शूटर्सना नंतर अटक करण्यात आली होती. 1993 बॉम्बस्फोटातील आरोपी याकुब मेमनच्या फाशीचा बदला घेण्यासाठी ही हत्या केल्याचा दावा त्यांनी तपासात केला होता. 
 

 

Web Title: David's handkerchief is running smoothly in Karachi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.