'दाऊद इब्राहिम पुरवतो झाकीर नाईकला पैसा, मुंबईतले उद्योगपतीही करतात मदत'

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2017 04:41 PM2017-09-26T16:41:30+5:302017-09-26T17:29:18+5:30

काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी अटक केलेला मोस्ट वॉंटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर पोलिसांच्या चौकशीमध्ये रोज नवनवे खुलासे करत आहे. दाऊद इब्राहिम आणि वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईक यांचे खास संबंध असल्याचा इक्बालने खुलासा केला आहे.

'Dawood Ibrahim gives Zakir Naik money, help from businessmen in Mumbai'; Iqbal Kaskar disclosure | 'दाऊद इब्राहिम पुरवतो झाकीर नाईकला पैसा, मुंबईतले उद्योगपतीही करतात मदत'

'दाऊद इब्राहिम पुरवतो झाकीर नाईकला पैसा, मुंबईतले उद्योगपतीही करतात मदत'

Next

ठाणे - काही दिवसांपूर्वी ठाणे पोलिसांनी अटक केलेला मोस्ट वॉंटेड दहशतवादी दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर पोलिसांच्या चौकशीमध्ये रोज नवनवे खुलासे करत आहे. दाऊद इब्राहिम आणि वादग्रस्त मुस्लीम धर्मोपदेशक झाकीर नाईक यांचे खास संबंध असल्याचा इक्बालने खुलासा केला आहे. वर्ष 2012 पासून दाऊद इब्राहिम झाकीर नाईकला पैसे पुरवत असल्याचा खळबळजनक खुलासा इकबाल कासकरने केला आहे. 

मुंबईतले काही उद्योगपती दाऊद इब्राहिमच्या सांगण्यावरून झाकीर नाईकची मदत करतात आणि त्याला पैशांचा पुरवठा करतात असा खुलासा इक्बालने केला आहे. झाकीर नाईकच्या एनजीओद्वारे हवाला नेटवर्कलाही पैसा पुरवला जातो असं कासकर म्हणाला. दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच आहे आणि त्याला पाकिस्तानात सुरक्षाही पुरवली जाते असा खुलासा यापूर्वी कासकरने केला होता. 

झाकीर नाईकवर दहशतवादाला प्रोत्साहन देण्याचा आरोप आहे. झाकीर नाईकला विशेष एनआयए न्यायालयाने ‘फरारी’ म्हणून जाहीर केले आहे. न्यायालयाने त्याला ‘फरारी’ जाहीर केल्यानंतर राष्ट्रीय तपास पथकाने (एनआयए) त्याची संपत्ती जप्त करण्यास सुरुवात केली.एनआयएने नाईकविरुद्ध गुन्हा नोंदविल्यावर तो तपास यंत्रणेपुढे उपस्थित राहिला नाही. अटकेच्या भीतीने तो देश सोडून पळून गेला. तपास यंत्रणेने त्याला अनेक वेळा समन्स बजावले तरीही तो भारतात परत आला नाही. त्यामुळे एनआयएने त्याला फरारी घोषित करावे, यासाठी विशेष न्यायालयाला अर्ज केला. तो मान्य करत विशेष न्यायालयाने नाईकला फरार जाहीर केले. 

अशाप्रकारे दाऊद इब्राहिम आणि इक्बाल कासकर करत होते एकमेकांशी संपर्क-

मिळालेल्या नवीन माहितीनुसार, दोघे भाऊ एकमेकांशी चॅटच्या माध्यमातून संपर्कात होते. तपासादरम्यान इक्बाल कासकरचं जीमेल अकाऊंट पोलिसांच्या हाती लागलं आहे. दाऊद इब्राहिमचा धाकटा भाऊ इक्बाल कासकरला ठाणे गुन्हे शाखेने अटक केली आहे. एका खंडणी प्रकरणामध्ये इक्बाल कासकरला अटक करण्यात आली. पोलिसांची मोबाइल फोनवर सतत नजर असल्याने दाऊद आणि इक्बाल कासकरने हा मार्ग अवलंबला होता. 

डीसीपी अभिषेक त्रिमुखे यांनी सांगितलं आहे की, 'पोलिसांच्या हाती इक्बाल कासकरचं जीमेल अकाऊंट लागलं आहे. आम्ही गुगलकडे पासवर्ड आणि इतर माहितीही मागितली आहे'.

मुलाने तयार करुन दिलं अकाऊंट 
जीमेलचा तपास केल्यानंतर आणखी महत्वाचे पुरावे हाती लागतील अशी पोलिसांना अपेक्षा आहे. यामुळे दाऊद इब्राहिम आणि इक्बाल कासकरभोवती फास आवळण्यास मदत मिळेल. इक्बाल कासकरच्या मोबाइल फोनची तपासणी केली असताना पोलिसांना या जीमेल आयडीची माहिती मिळाली. चौकशीदरम्यान इक्बाल कासकरने पोलिसांना सांगितलं की, मेल अकाऊंट माझ्या मुलाने तयार केलं आहे आणि पासवर्ड फक्त त्यालाचा माहिती आहे. मला मेल अकाऊंट वापरता येत नाही असा दावा इक्बाल कासकरने केला आहे. मात्र पोलिसांना त्याच्यावर विश्वास नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, इक्बाल कासकर मेल आणि इंटरनेटच्या सहाय्याने दाऊदसहित कुटुंब आणि अंडरवर्ल्डमधील इतर सदस्यांच्या संपर्कात होता. 

इक्बाल कासकरच्या मेलशी संबंधित सर्व लोकांवर पोलिसांची नजर आहे. सोबतच इक्बाल कासकरची एकाहून जास्त ई-मेल अकाऊंट असल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. ठाणे पोलिसांचं सायबर सेल जीमेलवरुन मिळालेल्या माहितीच्या आधारे तपास करत आहे. 

'दाऊद इब्राहिम पाकिस्तानातच, फोन टॅप होत असल्याच्या भीतीने कॉल करत नाही'
इकबाल कासकरने पोलिसांना याआधी माहिती दिली होती की, 'फोन टॅप होत असल्याच्या भीतीने दाऊद गेल्या तीन वर्षांपासून माझ्याशी आणि इतर नातेवाईकांशी बोलणं टाळत आहे'. मात्र आपण आपला दुसरा भाऊ अनीस अहमदच्या संपर्कात असल्याचा दावा त्याने केला होता. आपल्या आंतरराष्ट्रीय फोन क्रमांकावरुन अनीस ईद आणि इतर सणांना फोन करतो असं इकबाल कासकरने सांगितलं होतं. 'इकबाल कासकर तपासात सहकार्य करत नसून बोलण्यास नकार देत आहेत. मात्र त्याने आपण 1993 स्फोटातील आरोपी आपला मोठा भाऊ अनीस अहमदच्या संपर्कात असल्याचं मान्य केलं आहे', अशी माहिती पोलिसांनी दिली. 

Web Title: 'Dawood Ibrahim gives Zakir Naik money, help from businessmen in Mumbai'; Iqbal Kaskar disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.