अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनच्या तिहार कारागृहातील हत्येचा कट फसला, दाऊदने रचलं होतं षड़यंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: December 27, 2017 08:52 AM2017-12-27T08:52:58+5:302017-12-27T11:43:57+5:30
अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची तिहार कारागृहात हत्या घडवून आणण्याचा कट उघडकीस आला आहे. याची माहिती कारागृह प्रशासनाला मिळाल्यानंतर तातडीनं तेथील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला.
नवी दिल्ली - अंडरवर्ल्ड डॉन छोटा राजनची तिहार कारागृहात हत्या घडवून आणण्याचा कट उघडकीस आला आहे. याची माहिती कारागृह प्रशासनाला मिळाल्यानंतर तातडीनं तेथील सुरक्षेचा आढावा घेण्यात आला. दिल्लीतील टॉपचा गँगस्टर नीरज बवाना डी कंपनीच्या म्हणजेच कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमच्या इशा-यावरुन छोटा राजनला तिहार कारागृहात जीवे मारण्याचा कट रचत असल्याची गोपनीय माहिती गुप्तचर संस्थेला मिळाली आहे.
'टाइम्स ऑफ इंडिया'नं दिलेल्या माहितीनुसार, दोन आठवड्यांपूर्वी तिहार कारागृह प्रशासनाला मिळालेल्या या गुप्त माहितीमुळे स्थानिक गुंडांच्या सहाय्यानं छोटा डॉनचा गेम करण्याचा कट डी कंपनी आखत असल्याचा संशय निर्माण झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बवानाच्या साथीदारानं दारूच्या नशेत छोटा राजनच्या हत्येचा कट आपल्याच एका साथीदाराला सांगितला, त्यावेळी राजनचा काटा काढण्याचा डी कंपनीचा कट फसला आणि राजनच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आलेल्या अधिका-यांपर्यंत ही माहिती पोहोचली.
काही दिवसांपूर्वी बवानाच्या बराकमध्ये मोबाइल फोन आढळून आला. राजनला मुंबई किंवा महाराष्ट्रातील कारागृहात ठेवण्यापेक्षा तिहारसारख्या कडेकोट सुरक्षा असलेल्या कारागृहात ठेवल्यास त्याच्यावर हल्ला करणे कठीण जाईल, असा अधिकाऱ्यांचा अंदाज होता. तिहार कारागृहाच्या म्हणण्यानुसार, राजनला कडेकोट सुरक्षेत ठेवण्यात आले आहे आणि बवानासाठी राजनवर हल्ला करणं तितकं सोपं नाहीय.
एका अधिका-यानं दिलेल्या माहितनुसार, क्रमांक दोनच्या तुरुंगात राजनचा सेल सर्वांत शेवटी आहे. तर बवानाला स्वतंत्र अशा हायरिस्क वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. राजनच्या सुरक्षेसाठी विशेष सुरक्षा रक्षक आणि आचारी तैनात करण्यात आले असून यांची कसून तपासणी-चौकशीदेखील केली जाते.
तिहार कारागृहातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, बवानाचा एक साथीदार नोव्हेंबर महिन्यात कारागृहाबाहेर गेल्यानंतर राजनच्या हत्येच्या कटाची माहिती समोर आली. दाऊद स्थानिक गुन्हेगारांच्या मदतीने राजनला जीवे मारण्याचा प्रयत्न करणार असल्याचे समजल्यानंतर राजनच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले. कारागृहातील एका वरिष्ठ अधिका-यानं दिलेल्या माहितीनुसार, ''राजनवर हल्ला हा डी कंपनीसाठी प्रतिकात्मक विजयाप्रमाणे असेल व भारतीय सुरक्षेला धक्का असेल. विजय माल्यासारखा व्यक्ती तिहार आणि इतर कारागृहाच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित करताना असताना राजनशी निगडीत गोपनीय माहिती समोर आल्यानंतर आम्ही त्याकडे दुर्लक्ष करू शकत नाही''.
तर दुसरीकडे 1993 मुंबई बॉम्बस्फोटानंतर राजनने डीकंपनी सोडली. तेव्हापासून ते आजपर्यंत दाऊद राजनची हत्या करण्याच्या प्रयत्नात आहे. यापूर्वी बँकॉकमध्ये राजनवर हल्ल्याचा पहिला प्रयत्न करण्यात आला. एका अर्पाटमेंटमध्ये चार हल्लेखोरांनी घुसून राजनला मारण्याचा प्रयत्न केला मात्र हा प्रयत्न फसला.