Dawood: डॉनचा पत्ता सांगा, लाखो जिंका, ‘एनआयए’ने जाहीर केले २५ लाखांचे बक्षीस; इतरही रडारवर
By ऑनलाइन लोकमत | Published: September 2, 2022 03:56 AM2022-09-02T03:56:16+5:302022-09-02T03:57:06+5:30
Dawood Ibrahim: कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचे साथीदार यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बक्षिसे जाहीर केली आहेत.
मुंबई : कुख्यात डॉन दाऊद इब्राहिम आणि त्याचे साथीदार यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) बक्षिसे जाहीर केली आहेत. त्यानुसार दाऊदचा पत्ता सांगणाऱ्यास २५ लाख रुपये, तर त्याचा विश्वासू साथीदार छोटा शकील याचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास २० लाख रुपये इनाम जाहीर केले आहे. ‘डी गँग’मधील इतरही हस्तकांवर बक्षीस जाहीर करण्यात आले आहे.
दाऊद टोळीच्या कारवायांना उद्ध्वस्त करण्यासाठी एनआयएने दाऊद टोळीशी संबंधित खंडणी वसुली, सेटलमेंट, ड्रग्ज तस्करी आणि हवाला रॅकेट यांतील आर्थिक व्यवहार आणि सिंडिकेटबाबत चौकशी करून गुन्हा दाखल केला आहे. एनआयएच्या पथकांनी मुंबई आणि ठाण्यातील एकूण २९ ठिकाणी छापेमारी केली होती. त्यात काही महत्त्वाची कागदपत्रे हाती लागली. त्या अनुषंगाने तपास करीत एनआयएने सलीम फ्रुटला अटक केली.
सलीमने बांधकाम व्यावसायिकांना धमकावण्यासाठी आणि जागेचा मालकी हक्क मिळविण्यासाठी दाऊद टोळीतील छोटा शकीलच्या नावाचा वापर केल्याचा संशय आहे. एनआयएच्या तपासात सलीमने किमान दोन मालमत्तांबाबत दाऊद टोळीकडून धमकावल्याचे निष्पन्न झाले होते. तसेच अनेक बांधकाम व्यावसायिकांना धमकावून कोट्यवधींची खंडणी छोटा शकील व दाऊदपर्यंत पोहोचल्याचा एनआयएला संशय आहे.