दाऊदला आणणार की एअर स्ट्राईकचे पुरावे देणार?; मोदींच्या ट्विटनंतर आला तर्कवितर्कांचा महापूर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 27, 2019 05:56 PM2019-03-27T17:56:18+5:302019-03-27T18:02:10+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की काय घोषणा करणार याबाबत माध्यमांसह लोकांमध्ये अनेक चर्चांना उधाण आले होते.
नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी सकाळी 11.30 मिनिटांनी एक ट्विट केलं. यामध्ये 11.45 ते 12 दरम्यान मी देशासाठी महत्त्वाचा संदेश घेऊन येणार असल्याचं मोदी यांनी सांगितले. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी नक्की काय घोषणा करणार याबाबत माध्यमांसह लोकांमध्ये अनेक चर्चांना उधाण आले होते.
या ट्विटला धरून काश्मीरचे नेते ओमर अब्दुल्ला यांनी मोदी यांची खिल्ली उडवणारे ट्विट केले. नरेंद्र मोदी लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर करणार असल्याचं ओमर अब्दुल्लांकडून मोदींना टोला लगावण्यात आला.
He’s declaring the results of the Lok Sabha elections. #JustSaying
— Omar Abdullah (@OmarAbdullah) March 27, 2019
इतकचं नव्हे तर सोशल मिडीयातही नेटीझन्सकडून अनेक तर्क वितर्क लढवले जात होते. यामध्ये अंडरवर्ल्ड डॉन दाऊदला भारताने पकडलं अशी घोषणा मोदी करतील असाही ट्रेंड सुरु होता. काही जणांनी तर हाफीद सईद, मसूद अजहरला पकडण्यात भारताला यश आलं अशी घोषणा मोदी करतील असा दावा करण्यात आला. तर काश्मीरमधील कलम 370 हटविण्याबाबत नरेंद्र मोदी ऐतिहासिक घोषणा करतील असंही सांगण्यात आलं. तर काहींनी मोदी एअर स्टाईकचे पुरावे देणार असल्याचं सांगितले.
काही ट्विटर युजर्सकडून मोदींच्या या ट्विटची खिल्ली उडवत पुन्हा एकदा नरेंद्र मोदी नोटबंदीचा निर्णय करतील असं सांगितलं तर एकाने 15 लाख रुपये प्रत्येक भारतीयांच्या खात्यात जमा होतील असं सांगितलं. नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आलेल्या ट्विटनंतर प्रत्यक्षात पंतप्रधान देशाला संबोधित करेपर्यंत ट्विटरवर अक्षरश: धुमाकूळ माजला होता.
काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर नरेंद्र मोदी सरकार दाऊदला पकडून भारतात आणण्यात येईल अशी घोषणा करतील तसेच पाकिस्तानसोबत छोटं युद्ध करण्यात येईल असा आरोपही केला होता. त्यामुळे नरेंद्र मोदी नेमकी कोणती घोषणा करतील याबाबत अनेकांना उत्सुकता होती.
2016 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोणतीच कल्पना नसताना देशात नोटबंदीचा निर्णय जाहीर केला होता. रात्री 8 च्या सुमारास मोदी यांनी देशवासियांनी संबोधित करताना मध्यरात्री 12 पासून देशात 500 आणि 1000 च्या जुन्या नोटा बंद करण्यात येतील. अशा नोटा बाजारात चालणार नाही अशी घोषणा केली होती. त्यामुळे यावेळीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणेबाबत नेटीझन्सकडून अनेक चर्चा करण्यात येत होत्या.