दाऊदला यूएईचा दणका, 15 हजार कोटींची संपत्ती जप्त
By admin | Published: January 3, 2017 11:55 PM2017-01-03T23:55:05+5:302017-01-04T06:49:22+5:30
मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड आणि पाकिस्तानात लपून भारतविरोधी कारवाया करणारा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला संयुक्त अरब अमिराती(यूएई) च्या सरकारने जबर दणका दिला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
दुबई, दि. 3 - मुंबईत झालेल्या बॉम्बस्फोटांचा मास्टरमाइंड आणि पाकिस्तानात लपून भारतविरोधी कारवाया करणारा कुख्यात डॉन दाऊद इब्राहिमला संयुक्त अरब अमिराती(यूएई) च्या सरकारने जबर दणका दिला आहे. यूएई सरकारने दाऊदची त्यांच्या देशातील 15 हजार कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे. या संदर्भातील वृत्त झी न्यूज या हिंदी वृत्तवाहिनीने दिले आहे.
या वृत्तानुसार दाऊदने यूएईमध्ये हॉटेल, मॉल्स आणि इतर कंपन्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली आहे. मात्र, गैरमार्गाने जमविण्यात आलेल्या दाऊदच्या या संपत्तीवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी भारत सरकारकडून सातत्याने करण्यात येत होती.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी गेल्या वर्षी केलेल्या य़ूएई दौऱ्यादरम्यान दाऊदच्या संपत्ती संदर्भातील कागदपत्रे यूएई सरकारला सोपवली होती. त्यानंतर दाऊदच्या संपत्तीबाबत यूएई सरकारकडून चौकशी सुरू होती. अखेर यूएई सरकारने दाऊदच्या 15 हजार कोटींच्या संपत्तीवर टाच आणली आहे.