दाऊदचा सहकारी येडा याकूब याचा कराचीत मृत्यू
By admin | Published: August 7, 2015 10:13 PM2015-08-07T22:13:56+5:302015-08-07T22:13:56+5:30
कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी व १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी येडा याकूब पाकिस्तानातील कराची शहरात
मुंबई : कुख्यात गुंड दाऊद इब्राहिम याचा जवळचा सहकारी व १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी येडा याकूब पाकिस्तानातील कराची शहरात हृदयविकाराने मरण पावला. येडा याकूब ऊर्फ याकूब खान गेल्या काही महिन्यांपासून आजारी होता. शुक्रवारी सकाळी त्याला हृदयविकाराचा झटका आला. रुग्णालयात नेण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला.
मुंबईत १९९३ साली झालेल्या बॉम्बस्फोट मालिकेनंतर त्याने टायगर मेमनसोबत पाकिस्तानात पळ काढला होता. तेथे तो कापडाचा व्यापार करीत असे. कराचीत त्याचे कापड दुकानही होते. टायगर मेमनप्रमाणे पोलीस येडा याकूबचाही शोध घेत होते. पाकिस्तानातच दडून बसलेला येडा याकूब मुंबई पोलिसांच्या हाती लागलाच नाही.
याकूब व त्याचा मोठा भाऊ मजीद यांनी टायगर मेमनच्या वतीने १९९३ च्या मुंबई स्फोटात महत्त्वाची भूमिका बजावली होती. रायगड येथे आरडीएक्स उतरवून घेण्याचे काम या दोघांनी केले होते. मजीद ऊर्फ एम.के. बिल्डर याला २००० साली बांद्रा येथे छोटा राजनने गोळ्या घालून मारले होते. (वृत्तसंस्था)