छोटा राजनला संपवण्याचा दाऊदचा कट पुन्हा फसला
By admin | Published: July 2, 2015 12:33 PM2015-07-02T12:33:27+5:302015-07-02T12:37:48+5:30
अंडरवर्ल्डमधील डॉन छोटा राजन व दाऊद इब्राहिममधील युद्ध पुन्हा एकदा तापले असून वर्षाच्या सुरुवातीला दाऊदने छोटा राजनला मारण्याचा कट रचला होता.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - अंडरवर्ल्डमधील डॉन छोटा राजन व दाऊद इब्राहिममधील युद्ध पुन्हा एकदा तापले असून वर्षाच्या सुरुवातीला दाऊदने छोटा राजनला मारण्याचा कट रचला होता. मात्र छोटा राजन तिथून पळ काढण्यात यशस्वी झाल्याने दाऊदचा प्रयत्न फसला. छोटा राजनच्या निकटवर्तीयाने दाऊदला राजनच्या ठावठिकाण्याची माहिती पुरवल्याचे स्पष्ट झाले आहे.
छोटा राजन व दाऊद इब्राहिम यांच्यात कट्टर वैमनस्य असून १५ वर्षांपूर्वी दाऊदने बँकॉकमध्ये छोटा राजनवर जीवघेणा हल्ला केला होता. या हल्ल्यातून राजन बचावला असला तरी अजूनही दाऊदच्या मनात राजनविषयी राग असल्याचे उघड झाले आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणेचे दाऊद व राजनच्या निकवर्तीयांच्या फोन कॉल्सवर नेहमीच लक्ष असते. यातील संभाषण भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या हाती लागली असून यामध्ये राजनच्या हत्येचा कट रचल्याचे उघड झाले. कराचीतून भारतातील एका नंबरवर सर्वाधिक वेळा कॉल गेले होते. हिंदी व उर्दुत झालेल्या या संभाषणात दाऊदचा साथीदार छोटा शकीलने राजनच्या एका निकटवर्तीयाला फोडल्याचे स्पष्ट होते. त्या व्यक्तीला राजनची माहिती दिल्यास भरघोस पैसे देण्याचे आमीष देण्यात आले होते. या संभाषणात शकील म्हणतो, आम्हाला वाईट ठरवून तो स्वतः देशभक्त म्हणून सगळीकडे फिरत आहे, गेल्या वेळी आमचा नेम थोडक्यात चुकणार नाही, यंदा त्याचा काटा काढूच. पॉवर आमच्याकडे आहे, तू आम्हाला साथ दिलीस तर आम्ही तुझी पूर्ण 'काळजी' घेऊ असे शकीलने त्या व्यक्तीला सांगितले. यानंतर त्या व्यक्तीने राजन ऑस्ट्रेलियातील न्यूकासल येथे लपून बसल्याचे सांगितले.
राजनची माहिती मिळताच शकीलने एका शार्पशुटरला ऑस्ट्रेलियात पाठवलेही होते, मात्र याची कुणकुण लागल्याने राजनने तिथून अज्ञात स्थळी पळ काढला होता. राजन कुठे गेला याची माहिती कोणालाही नाही. गुप्तचर यंत्रणेच्या अधिका-यांनी या वृत्तावर अधिक भाष्य करणे टाळले आहे. मात्र दाऊदने राजनच्या हत्येचा कट रचला होता याला त्यांनी दुजोरा दिला.