अयोध्येत उत्साह शिगेला; भूमीपूजनाच्या दिवशी प्रभू रामाला हिरव्या रंगाचा पोशाख घालणार, कारण...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2020 11:56 AM2020-07-29T11:56:29+5:302020-07-29T11:58:06+5:30
जिल्ह्यातील सराफा व्यापारांचे शिष्टमंडळ मंगळवारी अयोध्येला रवाना झाला, बुधवारी चांदीची वीट मंदिर ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आली.
अयोध्या – प्रभू राम मंदिराचं भूमीपूजन येत्या ५ ऑगस्ट रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते करण्यात येणार आहे. या भूमीपूजनाची जय्यत तयारी अयोध्येत सध्या सुरु आहे. मंदिराच्या निर्माणासाठी ३-४ वर्ष लागतील. उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांनी भूमीपूजन सोहळ्याच्या तयारीचा आढावा घेतला आहे. राम मंदिराच्या निर्माणासाठी भूमीपूजनावेळी चांदीची वीट तयार करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील सराफा व्यापारांचे शिष्टमंडळ मंगळवारी अयोध्येला रवाना झाला, बुधवारी चांदीची वीट मंदिर ट्रस्टच्या ताब्यात देण्यात आली. गाझियाबाद सराफा असोसिएशनचे पदाधिकारी राज किशोर गुप्ता म्हणाले की, मंदिर निर्माणासाठी १२२ व्यापरांनी योगदानं दिलं आहे. यात तीन मुस्लीम बांधवांचाही समावेश आहे. २२ किलो ६०० ग्रॅम वजनाच्या चांदीच्या विटेची किंमत तब्बल १४ लाख ६० हजार रुपये इतकी आहे.
त्यासोबतच प्रभू राम आणि त्यांची भावंडे लक्ष्मण, भरत आणि शत्रुघ्न यांना भूमीपूजन सोहळ्याच्या निमित्ताने रत्नजडित कपडे घालण्यात येणार आहेत. रामदल सेवा ट्रस्टचे अध्यक्ष पंडित कल्की राम हे प्रभू रामाच्या मूर्तींना पोशाख परिधान करतील. या पोशाखात विविध प्रकारची ९ रत्ने जोडण्यात आली आहेत. तसेच प्रभू रामाला त्यादिवशी हिरव्या रंगाचा पोशाख घालण्यात येईल, कारण भूमीपूजन बुधवारी होणार असून त्यादिवशी हिरवा रंग शुभ मानला जातो असं कपडे शिवणाऱ्या भगवत प्रसाद यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आगमनासाठी अयोध्येत तयारी जोरदार सुरु आहे. ५ ऑगस्ट रोजी साडे ११ वाजता पंतप्रधान राम मंदिराचं भूमीपूजन करतील. ३२ सेकंदाच्या मुहूर्तात हे भूमीपूजन करण्यास सांगितले आहे.
दरम्यान, राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाला लक्ष्य केले आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मंदिर बांधले म्हणून कोरोना जाईल असं काही जणांना वाटत आहे, राम मंदिराचा वाद नाही, या भूमीपूजनाचं निमंत्रण मिळालं तरी मी जाणार नाही, कारण कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे, त्यामुळे राज्याच्या हिताची जबाबदारी मोठी आहे असं सांगत त्यांनी स्पष्टपणे भूमीपूजन सोहळ्याला जाण्यास नकार दिला आहे.