मायावतींवर आक्षेपार्ह टीका करणाऱ्या दयाशंकर सिंग यांची घरवापसी
By admin | Published: March 12, 2017 03:37 PM2017-03-12T15:37:40+5:302017-03-12T15:37:40+5:30
सपा अध्यक्षा मायावती यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या दयाशंकर सिंग यांची भाजपामध्ये घरवापसी झाली आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
लखनौ, दि. 12 - बसपा अध्यक्षा मायावती यांच्यावर आक्षेपार्ह भाषेत टीका करणाऱ्या दयाशंकर सिंग यांची भाजपामध्ये घरवापसी झाली आहे. शनिवारी भाजपाने उत्तर प्रदेशमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर दयाशंकर सिंग यांचे निलंबन तात्काळ रद्द करण्यात आले आहे. दयाशंकर सिंग यांची पत्नी स्वाती सिंग यांनी लखनौमधील सरोजिनीनगर येथून दणदणीत विजय मिळवला होता.
मायावतींवरील टिप्पणीनंतर दयाशंकर सिंग यांना पक्षातून तत्काळ प्रभावाने सहा वर्षांसाठी निलंबित करण्यात आले होते. त्यानंतर काही काळ फरार असलेल्या सिंग यांना तुरुंगाची हवाही खावी लागली होती. मात्र त्यांची पत्नी स्वाती सिंग यांना पक्षाने महिला मोर्चाचे अध्यक्ष बनवत सरोजिनीनगर येथून उमेदवारी दिली होती.
पक्षाने निलंबन रद्द करण्याचा निर्णय घेतल्यावर दयाशंकर सिंग म्हणाले,"मी जेव्हा तुरुंगातून बाहेर आलो. तेव्हाच सांगितले होते की मी भाजपासाठी अखेरपर्यंत काम करत राहीन. मी जे वक्तव्य केले होते. त्यासाठी मी माफीदेखील मागितली होती. पण माझी आई, पत्नी आणि मुलीबाबत आक्षेपार्ह टीप्पणी करणाऱ्यांवर मायावतींनी काहीही कारवाई केलेली नाही."