मायावतींबद्दल अपशब्द वापरणा-या दयाशंकर सिंह ६ वर्षांसाठी भाजपातून निलंबित
By admin | Published: July 20, 2016 05:11 PM2016-07-20T17:11:30+5:302016-07-20T23:25:25+5:30
बसपा प्रमुख मायावती यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरणा-या दयाशंकर सिंह याच्यावर भाजपने कडक कारवाई केली असून, त्यांना सर्व ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे.
Next
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २० - बसपा प्रमुख मायावती यांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह शब्द वापरणा-या दयाशंकर सिंह यांच्यावर भाजपाने कडक कारवाई केली असून, त्यांना ६ वर्षासाठी पक्षातून निलंबित करण्यात आले आहे. ते उत्तर प्रदेश भाजपचे उपाध्यक्ष होते. त्यांनी मायावतींवर टीका करताना त्यांची तुलना शरीर विक्रय करणा-या महिलांबरोबर केली होती.
या मुद्यावरून मायावती यांनी आज राज्यसभेत भाजपाला धारेवर धरताना दयाशंकर सिंह यांना तात्काळ अटक करण्याची मागणी केली होती. दयाशंकर सिंह यांच्या विधानाबद्दल अरुण जेटली यांनीही खेद व्यक्त केला. दयाशंकर सिंह यांचे विधान कुठल्याही परिस्थितीत आम्हाला मान्य नाही. दयाशंकर सिंह यांना आम्ही सर्व पदांवरुन हटवत आहोत, असे उत्तर प्रदेश भाजपाचे प्रदेशाध्यक्ष केशव प्रसाद मौर्य यांनी सांगितले.
दयाशंकर सिंहच्या विधानावरुन संसदेच्या दोन्ही सभागृहात जोरदार गदारोळ झाला. सर्वपक्षीयांनी त्यांच्या विधानाचा निषेध केला. मायावती पैसे घेऊन तिकिटं वाटत असल्याचा आरोप दयाशंकर सिंह यांनी केला आहे.
सकाळी एक कोटी रुपये देणाऱ्याला तिकिट दिलं जातं, दुपारी एखादा दोन कोटी घेऊन आला, तर त्याला तिकिट दिलं जातं आणि संध्याकाळी तीन कोटी रुपये देणारा मिळाला तर आधीच्यांचे पत्ते कापून तिसऱ्याला तिकिट दिलं जातं, असं सिंह यांनी म्हटलं होतं.