'गोध्राची पार्श्वभूमी असणाऱ्या मोदींच्या काळात संविधान धोक्यात'
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 05:46 AM2018-06-21T05:46:52+5:302018-06-21T06:50:26+5:30
इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी खूप काम केले पण जेव्हा त्यांनी संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा देशवासियांनी त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना धडा शिकवला.
मुंबई : इंदिरा गांधी यांनी गरिबांसाठी खूप काम केले पण जेव्हा त्यांनी संविधानाला हात लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा देशवासियांनी त्यांच्यासारख्या मोठ्या नेत्यांना धडा शिकवला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील हा इशारा आहे. गोध्रा हत्याकांडातील दोषींवर कारवाई झाली नाही, उलट त्यानंतर गुजरातमध्ये दंगली झाल्या, दोषींवर कारवाई करण्याऐवजी निर्दोष लोकांची हत्या झाली, तेव्हा नरेंद्र मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. ते आज देशाच्या पंतप्रधानपदी आहेत आणि संविधान धोक्यात आहे. हे वेगळे सांगायला नको, अशी टीका राष्टÑवादी काँग्रेसचे राष्टÑीय अध्यक्ष शरद पवार यांनी येथे केली.
राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने संविधान वाचवा, देश वाचवा कार्यक्रमाचे यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये आयोजन केले होते. पवार यांनी राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या कार्यप्रणालीवरही जोरदार टीका केली. गोळवलकर गुरुजींनी आंबेडकरांच्या संविधानाबाबत ‘बेंचेस आॅफ थॉट’ या पुस्तकातून टीका केली होती. अशांच्या विचारांवर चालणारा भाजपा आहे. ते संविधानाविषयी करत असलेली वक्तव्ये धादांत असत्य आहेत, असेही पवार यांनी सांगितले.
मध्यंतरी भाजपाचे मंत्री हेगडे यांनी संविधानाविरोधात वक्तव्य केले. त्यावर ते त्यांचे वैयक्तिक मत होते, असे सांगण्यात आले. परंतु त्यांनी एकप्रकारे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे गोळवलकर यांचे विचार स्पष्ट केले होते. गोळवलकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील काही शब्दांबाबत पवार यांनी शंका उपस्थित केली. राज्य घटना इतर देशांतून उचलून तयार केली आहे. ती परदेशी विचारधारेवर आधारीत आहे. त्यामुळे ती आपली म्हणण्याचे कारण नाही, असे संबंधित पुस्तकात म्हटले आहे. त्याचा अर्थ राष्ट्रीय स्वयंसेवक संघ राज्य घटना मानत नाहीत, असे पवार म्हणाले. दलित, अल्पसंख्याक, आदिवासींवर अन्याय झाला तर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी त्यांना संरक्षणही दिले पाहिजे, असे स्पष्ट आदेश प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी दिले.
खा. सुप्रीया सुळे, फौजिया खान, खा. माजीद मेमन यांनीही मार्गदर्शन केले. माजी न्यायमूर्ती अभय ठिपसे, खा. वंदना चव्हाण, आ. विद्या चव्हाण, महिला प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, डॉ. भारती पवार यांनी सरकारच्या धोरणावर टीका केली. महिला आरक्षण, संविधान बचाव, महिला अत्याचार विधेयक ठराव उषाताई दराडे, सुरेखा ठाकरे, डॉ. आशा मिरगे यांनी मांडले.