डीबी रिअॅलिटीचे मालक विनोद गोएंका यांच्या भावाचं अपहरण
By ऑनलाइन लोकमत | Published: February 20, 2018 11:23 AM2018-02-20T11:23:52+5:302018-02-20T11:24:40+5:30
डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांचा भाऊ प्रमोद गोएंका यांचं अपहरण झालं आहे. आफ्रिकन देश मोझॅम्बिकमधून एका टोळीने शनिवारी त्यांचं अपहरण केलं
मुंबई - डीबी रिअॅलिटी कंपनीचे मालक विनोद गोएंका यांचा भाऊ प्रमोद गोएंका यांचं अपहरण झालं आहे. आफ्रिकन देश मोझॅम्बिकमधून एका टोळीने शनिवारी त्यांचं अपहरण केलं. सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अपहरण केल्यानंतर त्यांना मापुतो या ठिकाणी नेण्यात आलं आहे. सोबतच त्यांच्या अपहरणाचे फोटो मित्राला पाठवण्यात आले आहेत. विनोद गोएंका यांनी परराष्ट्रमंत्रालयाला अपहरणाबद्दल माहिती दिली आहे.
विनोद गोएंका यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीनुसार, शनिवार संध्याकाळपासून त्यांचा भाऊ बेपत्ता आहे. आपण यासंबंधी परराष्ट्र मंत्रालयाला माहिती दिली आहे. मात्र त्यांनी अपहरण झाल्याचं किंवा खंडणी मागितल्याची कोणतीही माहिती नसल्याचं सांगितलं आहे.
आपला भाऊ विनोद गोएंका यांच्या बांधकाम व्यवसायातून बाहेर पडल्यानंतर प्रमोद गोएंका यांनी ज्वेलरीचा व्यवसाय सुरु केला होता. प्रमोद गोएंका यांचा मुलगा यश गोएंका याने सोमवारी जुहू पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल केली आहे.
'प्रमोद गोएंका यांनी शनिवारी सकाळी मापुतोला जाणारं विमान पकडलं होतं. व्यवसायासंबंधी चर्चा करण्यासाठी एका गुजराती व्यवसायिकाला ते भेटणार होते. शनिवारी संध्याकाळी त्यांनी त्यांच्या मोबाइलवरुन शेवटचा फोन केला होता. तेव्हापासून त्यांचा फोन स्विच ऑफ लागत आहे', अशी माहिती विनोद गोएंका यांनी दिली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जुहूचे रहिवासी असणारे प्रमोद गोएंका कोठारी नावाच्या एका व्यक्तीला भेटणार होते. कोठारी त्यांना हि-याच्या व्यापा-याची भेट घडवून देणार होते. सध्या दोघेही बेपत्ता आहेत. परराष्ट्र मंत्रालयाने विनोद गोएंका यांच्या अपहरणाची दखल घेतली असून कॉल रेकॉर्डच्या आधारे त्यांचा शोध घेण्यास सांगितलं आहे.
मोझाम्बिकच्या राजधानीत आतापर्यंत 95 जणांचं अपहरण झाल्याचं आकडेवारीतून स्पष्ट होतंय. 2015 आणि 2015 मध्ये सर्वात जास्त अपहरणाच्या घटना झाल्या आहेत. अनकेदा अपहरणकर्ते लहान मुलं आणि श्रीमंत व्यवसायिकांना टार्गेट करतात. अनेक प्रकरणांमध्ये खंडणी मिळाल्यानंतर कोणतंही नुकसान न करता संबंधित व्यक्तीची सुटका करण्यात येते. भीतीपोटी अनेकदा पोलिसांपर्यंत ही प्रकरणं पोहोचत नाहीत.