कलेक्टरांनी गावखेड्यातील रुग्ण बनून सरकारी डॉक्टरांना कॉल केला अन्...; खासदारांनी केलं कौतुक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 25, 2021 09:05 AM2021-04-25T09:05:14+5:302021-04-25T09:18:41+5:30
महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याचे भूमीपुत्र असलेले रमेश घोलप सध्या झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यात जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. गेल्या 8 ते 9 वर्षांपासून ते झारखंडसाठी आपली सेवा देत आहेत
मुंबई - देशावर सध्या कोरोना महामारीचं संकट मोठ्या प्रमाणात असून प्रशासकीय यंत्रणा सर्वस्व पणाला लावून काम करत आहे. एकीकडे रुग्णालयात बेड, इंजेक्शन, ऑक्सिजन यांची करतरता आहे. तर, दुसरीकडे इंजेक्शनचा काळाबाजार, रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिलांची आकारणी यांसारख्याही माणूसकीला काळीमा फासणाऱ्या घटना घडत आहे. मात्र, झारखंडच्या कोडरमा जिल्ह्यातील जिल्हाधिकारी रमेश घोलप यांनी आपल्या जिल्ह्यात केलेल्या कामामुळे नागरिकांसह अनेक नेतेमंडळींनीही त्यांचं कौतुक केलंय.
महाराष्ट्राच्या सोलापूर जिल्ह्याचे भूमीपुत्र असलेले रमेश घोलप सध्या झारखंडमधील कोडरमा जिल्ह्यात जिल्हाधिकारी पदावर कार्यरत आहेत. गेल्या 8 ते 9 वर्षांपासून ते झारखंडसाठी आपली सेवा देत आहेत. अतिशय गरिब कुटुंबातून, प्रतिकुल परिस्थितीशी संघर्ष करत त्यांनी या पदाला गवसणी घातली आहे. त्यामुळे, त्यांच्या कार्यप्रणातील सर्वसामान्य आणि गोरगरीब माणूस नेहमीच केंद्रबिंदू राहिलाय. सध्या कोरोना कालावधीतही त्यांचं काम अनेकांसाठी प्रेरणादायी आणि अभिमानास्पद ठरत आहे. नवनवीन संकल्पना राबवत नागरिकांना सहज सेवा उपलब्ध करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो.
सध्या कोरोना महामारीच्या संकटातही त्यांचं काम कौतकास्पद आहे. रुग्णांची कोविड रुग्णालयात जाऊन प्रत्यक्ष पाहणी करणं, त्यांच्या समस्या जाणून घेणं यांसह प्रशासकीय यंत्रणा कामाला लावणं, यातून त्यांनी नागरिकांची मनं जिंकली आहेत. नुकतेच त्यांची एक ऑडिओ क्लीप मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. कोडरमा जिल्ह्यात होम आयसोलेटेड रुग्णांसाठी त्यांनी टेलीमेडीसीन सेवा सुरू केली आहे. त्याद्वारे जिल्ह्यातील 3 डॉक्टरांकडून रुग्णांना घरबसल्या मेडिसीन आणि उपचाराचा सल्ला देण्यात येतो. मात्र, आपले सरकारी डॉक्टर आपलं काम चोखपणे पार पाडतात का, हे पाहण्यासाठी त्यांनी चक्क गाव-खेड्यातील रुग्ण बनून डॉक्टरांना फोन केला. जिल्हाधिकारी साहेबांच्या या परीक्षेत संबंधित डॉक्टर पासही झाले. मात्र, त्यांनंतरही, तुमच्यावरील ताण मी समजू शकतो, पण पुढील काही दिवस आपणा सर्वांना थोडासा ताण सहन करावाच लागेल, असे ते सांगतात. कोरोनाच्या लढाईत न थकता, न रुकता आपण लढायचं आणि जिंकायचं असा मंत्र त्यांनी यावेळी संबंधित डॉक्टरांना दिला आहे.
अभी ऐसे ही एडमिनिस्ट्रेटर्स-फेसिलिटेटर्स की, इसी एप्रोच की जरूरत है। @dckoderma और कोविड हेल्पलाइन सेवा में तैनात डॉक्टर की बातचीत सुनिये। अगर इसी तरह के अनुभव राज्य के सभी जिलों से मिलें तो #कोरोना के खिलाफ हमारी जंग कितनी आसान हो जाये।@HemantSorenJMM@BannaGupta76@DCsofIndiapic.twitter.com/oRvqLdC9TY
— Mahesh Poddar (@maheshpoddarmp) April 24, 2021
जिल्हाधिकारी रमेश घोलप यांची ही ऑडिओ क्लीप सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे झारखंडमधील भाजपा खासदार महेश पोद्दार यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन या ऑडिओ क्लीपचा व्हिडिओ शेअर केला आहे. तसेच, सध्यस्थितीत अशाच प्रशासकीय अधिकाऱ्यांची आणि यंत्रणेची गरज आहे. जिल्हाधिकारी कोडरमा आणि तैनात डॉक्टरांमधील हा संवाद ऐका... राज्याच्या सर्वच जिल्ह्यात असे अनुभव आपल्याला आले तर, कोरोनाविरुद्ध आपली लढाई अतिशय सोपी होईल, असे म्हणत डीसी रमेश घोलप यांच्या कामाचं पोद्दार यांनी कौतुक केलंय.