स्वाती मालीवाल यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2019 08:31 AM2019-12-15T08:31:22+5:302019-12-15T08:31:50+5:30
महिला अत्याचाराविरोधात ३ डिसेंबरपासून उपोषण
नवी दिल्ली : बलात्कार प्रकरणातील दोषींना सहा महिन्याच्या आत फाशी द्यावी, या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या दिल्ली महिला आयोगाच्या (डीसीडब्ल्यू) अध्यक्षा स्वाती मालीवाल यांची तब्येत बिघडली असून त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आहे.
स्वाती मालीवाल यांना उपोषणाच्या 13 व्या दिवशी म्हणजेच आज, रविवारी सकाळी दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. स्वाती मालीवाल यांच्यावर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत असल्याचे कालच डॉक्टरांनी सांगितले होते. डॉक्टरांनी त्यांना उपोषण मागे घेण्याचा सल्ला दिला. तसेच, उपोषण संपुष्टात न आल्यास मूत्रपिंडाला नुकसान पोहोचू शकते, असेही डॉक्टरांनी म्हटले होते.
Delhi: Delhi Commission for Women (DCW) Chief, Swati Maliwal who is on a hunger strike demanding death penalty for convicts in rape cases within 6 months, taken to LNJP hospital after she falls unconscious. pic.twitter.com/WUvc5yT0zI
— ANI (@ANI) December 15, 2019
दरम्यान, हैदराबाद येथील डॉक्टर तरूणीवर अत्याचार करून जाळून टाकण्याच्या घटनेनंतर स्वाती मालीवाल यांनी महिला अत्याचाराविरोधात ३ डिसेंबरपासून उपोषण सुरू केले आहे. तसेच, गेल्यावर्षी सुद्धा उन्नाव आणि कठुआ बलात्काराच्या घटनेनंतर महिलांवरील अत्याचाराच्या विरोधात स्वाती मालीवाल यांनी बेमुदत उपोषण केले होते.
बलात्काऱ्यास 21 दिवसांत फाशी
हैदराबाद आणि उन्नाव घटनेनंतर महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा देशभरात ऐरणीवर आला असताना विविध राज्ये त्यादृष्टीने काही ठोस पावले उचलत आहेत. आंध्र प्रदेश सरकारने विधानसभेत विधेयक पारित केले आहे की, ज्याअंतर्गत महिलांवरील बलात्काराची प्रकरणे 21 दिवसांच्या आत निकाली काढण्यात येणार आहेत. याशिवाय, दोषींना फाशीची शिक्षा सुनावण्याची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आली आहे.