डीडीसीए घोटाळा; सीबीआय चौकशी करा!
By admin | Published: December 29, 2015 02:54 AM2015-12-29T02:54:49+5:302015-12-29T02:54:49+5:30
डीडीसीएत घोटाळा झालाच नसल्याचे एसएफआयओ चौकशीमध्ये आढळून आल्याचा भाजपचा दावा पक्षाचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी फेटाळून लावला आहे. सीबीआय किंवा
नवी दिल्ली : डीडीसीएत घोटाळा झालाच नसल्याचे एसएफआयओ चौकशीमध्ये आढळून आल्याचा भाजपचा दावा पक्षाचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी फेटाळून लावला आहे. सीबीआय किंवा ईडीसारख्या केंद्रीय तपास संस्थांकडून या डीडीसीए घोटाळ्याची सर्वंकष चौकशी करण्याची मागणी आझाद यांनी केली.
आझाद सोमवारी पत्रकारांशी बोलत होते. एसएफआयओने (सिरियस फ्रॉड इन्व्हेस्टिगेशन आॅफीस) केवळ त्यांना देण्यात आलेल्या कागदपत्रांचाच तपास केला. कोट्यवधी रुपये देण्यात आलेल्या कंपन्या आजही अस्तित्वात आहेत की नाही याचा तपास एसएफआयओने केला नाही, असे आझाद यांनी सांगितले.
आपण वित्तमंत्री अरुण जेटली यांना लक्ष्य करीत नव्हतो तर या घोटाळ्यात आपल्याला काँगेस नेत्यांना ओढायचे होते, असे स्पष्ट करून आझाद म्हणाले, संपुआ सरकारने कोणतीही कारवाई केली नाही, कारण राजीव शुक्ला, नवीन जिंदाल आणि अरविंदसिंग लवली यांच्यासारखे सरकारचे अनेक नियुक्त सदस्य डीडीसीएचे संचालक म्हणून काम करीत होते आणि त्यांनी आपल्या कर्तव्यात बेजबाबदारपणा आणि गैरप्रकार केले. ‘काहीही परिश्रम न करता बनावट पत्ता असलेल्या बँक खात्यांमध्ये कोट्यवधी रुपये स्थानांतरित करण्यात आले. हा फार मोठा घोटाळा आहे कारण एकाच व्यक्तीला एकाच कामासाठी पुन्हा पुन्हा पैसे देण्यात आले. मजजवळ त्याचे पुरावे आहेत. माझा हा लढा क्रीडा संस्थांमधील भ्रष्टाचाराविरुद्ध आहे. माझा लढा जेटलींविरुद्ध नाही,‘ असे आझाद यांनी स्पष्ट केले. जेटली यांच्याविरुद्ध आरोप केल्याबद्दल भाजपाने आझाद यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याच्या आरोपावर आपली भूमिका स्पष्ट करताना आझाद म्हणाले, ‘भाजपा किंवा जेटली यांना माझा विरोध नाही. मी जेटली यांना केव्हा आणि कुठे लक्ष्य बनविले हे मला अद्याप समजलेले नाही. मी भाजपाविरुद्ध काहीही बोललो नाही. मी पक्षाचा निष्ठावान सैनिक राहिलो आहे. परंतु मी भ्रष्टाचाराविरुद्ध मात्र लढत राहणार. डीडीसीएमधील गैरप्रकाराची सीबीआय आणि ईडी व डीआरआयसारख्या तपास संस्थांकडून चौकशी करण्यात आली पाहिजे.’
आझाद यांनी अनेक कंपन्यांची नावे सांगितले. या कंपन्या कोट्यवधी रुपये खिशात घालत असून त्यांचे डीडीसीए अधिकाऱ्यांसोबत साटेलोटे आहे, असा आरोप त्यांनी केला. (लोकमत न्यूज नेटवर्क)
अरविंद केजरीवाल जेटलींना क्लीन चिट नाही
डीडीसीए घोटाळ्याची चौकशी करणाऱ्या समितीने वित्तमंत्री अरुण जेटली किंवा अन्य कुणालाही अद्याप क्लीन चिट दिलेली नाही. जेटलींना क्लीन चिट देण्यात आल्याचा भाजपचा दावा फुसका आहे, असे दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
जेटलींना क्लीन चिट देण्यात आली नाही. त्यामुळे त्यांना लक्ष्य केल्याबद्दल माफी मागणार नाही. भाजप माफीसाठी भीक मागत आहे, असे केजरीवाल यांनी म्हटले आहे. अबु्रनुकसानीच्या खटल्यात जेटलींना उलटतपासणीला सामोरे जाऊ द्या, मग पाहू,’ असे टिष्ट्वट केजरीवाल यांनी केले.
सिसोदियांचा सवाल : जेटलींना निर्दोष ठरविण्याची घाई का?
उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी डीडीसीए घोटाळ्याबाबत भाजपा आणि जेटली यांना पाच प्रश्न विचारले आहेत. जेटली आणि भाजपा चौकशीपासून पळ का बरे काढत आहे, असा सवालही सिसोदिया यांनी केला. ‘आमच्या चौकशी समितीने या अहवालात कुणाचेही नाव घेतलेले नाही.
याचा अर्थ जेटली अध्यक्ष असतानाच्या काळात भ्रष्टाचार घडलाच नाही असे म्हणता येत नाही. जेटलींना निर्दोष ठरविण्यात एवढी घाई का? एवढा दबाव कशासाठी? चौकशी समितीने कालच चौकशीला प्रारंभ केला आहे,’ असे सिसोदिया म्हणाले.
भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न
भ्रष्टाचार लपविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे किंवा काय, अशी शंकाही आझाद यांनी उपस्थित केली. ‘सीबीआयने छापा घालण्याऐवजी डीडीसीएला फक्त नोटीस बजावल्या आणि आरोपींना पुरावे नष्ट करण्याची संधी दिली. मी ९० टक्के चौकशी केलेली आहे.
सीबीआय माझ्याकडून पुरावे घेऊ शकते. पण सीबीआय मंद गतीने का काम करीत आहे हे कळत नाही. जेटली अध्यक्ष असताना आर्थिक गैरप्रकारांबाबत मी आणि इतरांनी त्यांना किमान २०० पत्रे लिहिली होती, असे आझाद म्हणाले.