डीडीसीएतील भ्रष्टाचाराविरुद्ध लढत राहणार - कीर्ती आझाद

By Admin | Published: January 11, 2016 03:14 AM2016-01-11T03:14:52+5:302016-01-11T03:14:52+5:30

डीडीसीएमधील कथित भ्रष्टाचाराविरुद्ध आपण सतत लढत राहणार आणि आपल्याला या मोहिमेपासून कुणीही दूर करू शकत नाही, असे रोखठोक प्रतिपादन भाजपाचे निलंबित खासदार

DDCA will be fighting against corruption - Kirti Azad | डीडीसीएतील भ्रष्टाचाराविरुद्ध लढत राहणार - कीर्ती आझाद

डीडीसीएतील भ्रष्टाचाराविरुद्ध लढत राहणार - कीर्ती आझाद

googlenewsNext

कोची : डीडीसीएमधील कथित भ्रष्टाचाराविरुद्ध आपण सतत लढत राहणार आणि आपल्याला या मोहिमेपासून कुणीही दूर करू शकत नाही, असे रोखठोक प्रतिपादन भाजपाचे निलंबित खासदार कीर्ती आझाद यांनी रविवारी केले. डीडीसीएने शनिवारी आझाद आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल केला होता, हे येथे उल्लेखनीय आहे.
पक्षातर्फे करण्यात आलेल्या शिस्तभंग कारवाईमुळे जराही विचलित न झालेले आझाद यांनी केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याविरुद्धचे हल्लेही सुरूच ठेवले आहेत. डीडीसीएविरुद्धच्या आपल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांचा पुनरुच्चार करून आझाद म्हणाले, २००८मध्ये दिल्लीच्या फिरोजशाह कोटला स्टेडियमच्या नूतनीकरणाच्या कामात भ्रष्टाचार झाला आहे. त्याचे पुरावे आहेत आणि हे प्रकरण मांडण्यासाठी आपण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे वेळ मागितला आहे.
आझाद हे रविवारी कोची येथे एर्नाकुलम प्रेस क्लबतर्फे आयोजित ‘मीट द प्रेस’ कार्यक्रमात बोलत होते. डीडीसीएने दाखल केलेल्या मानहानीच्या दाव्याबाबत बोलताना ते म्हणाले, ‘माझ्याविरुद्ध मानहानीचा दावा दाखल करणाऱ्या सर्वांचा मी आभारी आहे आणि यापुढे एकापाठोपाठ एक असे अनेक पुरावे (भ्रष्टाचाराविरुद्धचे) हाती लागणार आहेत. तुम्हाला भ्रष्टाचार या विषयात पीएच.डी. करावयाची असेल तर डीडीसीएत जा. तुम्हाला एका महिन्यात पदवी मिळेल. या प्रकरणी भाजपा जो काही निर्णय घेईल त्याचा आपण आदर करू. पण मला कुणीही रोखू शकत नाही. मी एका स्वातंत्र्य संग्राम सेनानीचा पुत्र आहे. मला भ्रष्टाचाराविरुद्ध लढण्यापासून कुणीही रोखू शकत नाही.’
‘शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब शिल्लक असेपर्यंत आणि शेवटच्या श्वासापर्यंत मी भ्रष्टाचाराविरुद्ध लढत राहणार. मी आमच्या मुलांच्या भविष्यासाठी लढतो आहे आणि आम्ही चांगल्या हेतूसाठी एकत्र येऊन लढले पाहिजे,’ असेही आझाद यांनी या वेळी सांगितले. बीसीसीआयमधील भ्रष्टाचारावरून रालोआ आणि संपुआ या दोन्ही आघाडीतील सर्व नेते भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर एकत्र आले होते, असे ते म्हणाले.
एका स्टेडियमवर १४१ कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि हे काम अद्याप सुरू आहे. ईपीआयएलला दिलेल्या कंत्राटासाठी कार्यकारी समितीने २५ कोटी रुपये मंजूर केले होते. हा एक पुरावा सोडला तर रेकॉर्डवर अन्य कोणताही पुरावा उपलब्ध नाही. त्यांना बिल्डिंगचा आराखडा बदलायचाच होता तर त्यासाठी आधी मंजुरी मिळविणे आवश्यक होते. तसे न करणे हा भ्रष्टाचार नाहीतर मग काय आहे, असा सवाल आजाद यांनी केला. पुढच्या खर्चाची मंजुरी घेतल्याची डीडीसीए कार्यकारी समितीच्या बैठकीतील इतिवृत्तात नोंदच नाही, असा आरोप त्यांनी केला. (वृत्तसंस्था)

Web Title: DDCA will be fighting against corruption - Kirti Azad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.