५२ लाख बनावट मोबाईल कनेक्शन बंद, सिमकार्ड डिलर्सची पोलीस पडताळणी आता अनिवार्य - अश्विनी वैष्णव
By ऑनलाइन लोकमत | Published: August 17, 2023 04:34 PM2023-08-17T16:34:34+5:302023-08-17T16:37:05+5:30
मे २०२३ पासून सिम कार्ड विक्रेत्यांवर ३०० एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
नवी दिल्ली : सरकारने फसवणूक रोखण्यासाठी सिम कार्ड डीलर्सची पोलिस पडताळणी अनिवार्य केली आहे आणि 'बल्क कनेक्शन' देण्याची तरतूद आता बंद करण्यात आली आहे, असे केंद्रीय दूरसंचार मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुरुवारी सांगितले. तसेच, सरकारने ५२ लाख मोबाईल कनेक्शन बंद केले आहेत. ६७,००० डीलर्सची नावे काळ्या यादीत टाकण्यात आली आहेत. मे २०२३ पासून सिम कार्ड विक्रेत्यांवर ३०० एफआयआर नोंदवण्यात आले आहेत, असे अश्विनी वैष्णव म्हणाले.
व्हॉट्सअॅपने फसवणुकीच्या कृत्यांमध्ये गुंतलेली जवळपास ६६,००० खाती ब्लॉक केली आहेत.आता आम्ही फसवणूक रोखण्यासाठी सिम कार्ड डीलरचे पोलिस पडताळणी अनिवार्य केले आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डिलरला १० लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात येणार आहे. तसेच, १० लाख सिम डीलर आहेत आणि त्यांना पोलिस पडताळणीसाठी पुरेसा वेळ दिला जाईल, असे अश्विनी वैष्णव यांनी सांगितले.
VIDEO | "Since the launch of Sanchar Saathi portal, we have detected and deactivated 52 lakh connections which were fraudulently obtained. We have also blacklisted 67,000 dealers engaged in selling mobile SIM cards," says Union minister @AshwiniVaishnaw. pic.twitter.com/IxQMSImtA2
— Press Trust of India (@PTI_News) August 17, 2023
याचबरोबर, दूरसंचार विभागाने मोठ्या प्रमाणात 'कनेक्शन' देण्याची सेवाही बंद केली आहे. त्याऐवजी, व्यवसाय कनेक्शनची नवीन संकल्पना सादर केली जाईल. याशिवाय, व्यवसायांचे केवायसी (KYC) आणि सिम घेणार्या व्यक्तीचे KYC देखील केले जाईल.तसेच, केवायसी संस्थेची किंवा गुंतवणूकदाराची ओळख आणि पत्ता प्रमाणित करण्यात मदत मिळते, असेही अश्विनी वैष्णव म्हणाले.