गंगेच्या किनाऱ्यावर पुन्हा वाहत आले मृतदेह, एकाच वेळी चार मृतदेह सापडल्याने खळबळ
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 10:48 AM2022-05-05T10:48:37+5:302022-05-05T10:49:13+5:30
Dead Bodies Found In Ganga River: बिहारमधील बक्सर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या नाथ बाबा घाटावर नदीतून चार मृतदेह वाहत आल्याने खळबळ उडाली आहे.
पाटणा - बिहारमधील बक्सर शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे गंगा नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या नाथ बाबा घाटावर नदीतून चार मृतदेह वाहत आल्याने खळबळ उडाली आहे. मिळालेल्य माहितीनुसार जेव्हा काही लोक गंगेच्या किनाऱ्यावर गेले, तेव्हा त्यांना किनाऱ्यावर चार मृतदेह दिसले. या प्रकाराची माहिती स्थानिक प्रशासनाला देण्यात आली आहे. त्यानंतर बक्सरच्या एडीएमनी ताकडीने कारवाई करून नगर परिषदेला मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्याची सूचना दिली.
मात्र हे मृतदेह कुणाचे आहेत आणि गंगा नदीमध्ये कुठून आले, या प्रश्नाचं उत्तर सध्यातरी कुणाकडेच नाही आहे. गेल्यावर्षी देशात कोरोनामुळे गंभीर परिस्थिती ओढवली असताना बक्सर चर्चेत आलं होतं. तेव्हा चौसा येथील स्मशान घाटाजवळ शेकडो मृतदेह गंगेतून एकसाथ वाहून आले होते. प्रशासनात खळबळ उडाली होती. त्यावंतर जिल्हा प्रशासनाने हे मृतदेह दफन केले होते. या प्रकरणी तपास केल्यानंतर सर्व मृतदेह उत्तर प्रदेशातून वाहून बिहारमध्ये आले होते, अशी माहिती समोर आली.
अशा परिस्थितीत पुन्हा एकदा बक्सरच्या नाथ बाब घाटाजवळच्या गंगा किनाऱ्यावर पुन्हा एकदा चार मृतदेह सापडल्याने शहरात खळबळ उडाली आहे. तसेच गंगेच्या स्वच्छता अभियानावर प्रश्न उपस्थित होत आहे. मात्र प्रशासन या प्रकरणी तपास करण्याची तयारी दर्शवत आहे. मात्र हे मृतदेह गंगाघाटावर कुठून वाहून आले, याबाबत कुणीही उघडपणे बोलण्यास तयार नाही.