भयावह, भयानक, भीषण! गंगा नदीजवळ वाळूत अनेक मृतदेहांचं दफन; स्थानिकांमध्ये घबराट
By ऑनलाइन लोकमत | Published: May 13, 2021 04:22 PM2021-05-13T16:22:46+5:302021-05-13T16:23:09+5:30
उत्तर प्रदेशच्या उन्नवमध्ये अनेक मृतदेहांचं दफन गंगा नदीच्या किनारी केलं जातंय. यामुळे स्थानिक चिंतेत आहेत
उन्नव: देशात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं कहर केला असून दररोज तीन लाखांहून अधिक कोरोना रुग्णांची नोंद होत आहे. गेल्या आठवड्यात देशात दिवसाला ४ लाखांहून अधिक रुग्ण आढळून येत होते. मागील आठवड्याच्या तुलनेत परिस्थितीत काहीशी सुधारणा असली तरी देशातील मृतांचा आकडा दिवसागणिक वाढत आहे. उत्तरेकडील राज्यांमध्ये भीषण परिस्थिती आहे. काही दिवसांपूर्वी बिहारच्या बक्सरमध्ये गंगा नदीतून मृतदेह वाहत आले होते. त्यानंतर आता उत्तर प्रदेशातील भीषण वास्तव समोर आलं आहे.
सुट्टी न घेता बजावत होती कर्तव्य, आई बनल्यानंतर आठवड्यातच झाला कोरोनामुळे अंत
पूर्वांचल आणि बिहारमध्ये गंगा नदीत मृतदेह आढळून आल्यानंतर बिहार आणि उत्तर प्रदेशमधील प्रशासनानं हात वर करत जबाबदारी एकमेकांवर ढकलली. यानंतर आता उत्तर प्रदेशच्या उन्नवमधील एक भयानक दृश्य समोर आलं आहे. गंगा नदीच्या पात्रात असलेल्या वाळूत दोन ठिकाणी काही मृतदेह दफन करण्यात आले आहेत. हे मृतदेह कोरोना रुग्णांचे असल्याची भीती स्थानिकांनी वर्तवली आहे.
कुठे हवन तर कुठे जलार्पण; अंधश्रद्धेचा वेढा असताना कसा जिंकणार कोरोनाविरुद्धचा लढा?
शुक्लागंज हाजीपूरच्या रौतापूरमध्ये गंगा घाट आहे. या ठिकाणी असलेल्या वाळूमध्ये अनेक मृतदेह दफन करण्यात आले आहेत. या ठिकाणचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अंत्यसंस्कारासाठी लाकडं कमी पडत असल्यानं काही हिंदू धर्मीयांनी पार्थिवांना अग्नी न देता ते दफन केल्याचं सांगण्यात येत आहे. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, रौतापूर घाट परिसरात गेल्या २० दिवसांपासून अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. बुधवारी या ठिकाणी १६ जणांवर अंत्यसंस्कार झाले. त्यापैकी १३ जणांचे मृतदेह वाळूत दफन केलेल्या स्थितीत होते. पिपरी, लंगडापुरवा, मिर्झापूर, भटपुरवा, राजेपूर, कनिकामऊ यासह अनेक गावांमधील लोक इथे अंतसंस्कारांसाठी येतात.