संतापजनक! पोलिसांनी कचऱ्याच्या गाडीतून नेला शेतकऱ्याचा मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2021 09:09 AM2021-05-31T09:09:04+5:302021-05-31T09:09:14+5:30
Farmers Dead Body Garbage Cart: पोलीस आणि कर्मचाऱ्यांकडून मृतहेदांवरील अंत्यसंस्कारांदरम्यान असंवेदनशीलता दाखवत असल्याचे वारंवार दिसून येत आहेत.
लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये सरकार आणि प्रशासनाकडून मृतदेहांवर पूर्ण प्रोटोकॉलप्रमाणे आणि पूर्ण सन्मानासह अंत्यसंस्कार करण्याचे आदेश दिले जात आहेत. मात्र असे असतानाही पोलीस आणि कर्मचाऱ्यांकडून मृतहेदांवरील अंत्यसंस्कारांदरम्यान असंवेदनशीलता दाखवत असल्याचे वारंवार दिसून येत आहेत. आता एका शेतकऱ्याचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह हा कचऱ्याच्या गाडीतून नेल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. (Farmers Dead Body Garbage Cart Viral Video In Uttar Pradesh)
हा संतापजनक प्रकार उत्तर प्रदेशमधील बुंदेलखंड विभागातील महोबा जिल्ह्यात घडला आहे. बुंदेलखंडमधील महोबामध्ये पोलिसांनी एका शेतकऱ्याच्या मृतदेहासोबत हे अपमानास्पद वर्तन केले. खरेला परिसरात राहणारे शेतकरी रामकरण यां ताप, सर्दी आणि खोकल्याचा त्रास जाणवत होता. प्रकृती बिघडल्याने त्यांचा मुलगा त्यांना रुग्णालयात घेऊन आला. मात्र रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कोरोनाकाळात संशयास्पद मृत्यू झाल्याने रुग्णालयाने पूर्ण खबरदारी घेतली.
या घटनेची माहिती पोलिसांना दिली गेली. पोलिसांनी पंचनामा केला. मात्र धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी या शेतकऱ्याचा मृतदेह कचऱ्याच्या गाडीतून पोस्टमार्टेमसाठी नेला. या संदर्भातील एक व्हिडीओ समोर आला असून, दोन पोलीस कर्मचारी पॉलिथिनमध्ये गुंडाळलेला मृतदेह कचऱ्याच्या गाडीत ठेवताना दिसत आहेत. आथा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर स्थानित एएसपी आर. के. गौतम यांनी चरखारी परिसातील सी.ओ.के. यांना या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले आहेत.
दरम्यान, उत्तर प्रदेशमधील बलरामपूर येथूनही असाच एक व्हिडीओ व्हायरल झाला होता. यामध्ये दोन व्यक्ती एक मृतदेह पुलावरून नदीत फेकताना दिसत आहेत. हा व्हिडीओ २८ मे रोजीचा असल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, कोरोनामुळे मृत्यू झालेल्या प्रेमनाथ मिश्र यांचा मृतदेह राप्ती नदीत फेकल्याप्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. त्यामध्ये प्रेमनाथ यांचा पुतण्या संजय शुक्ल आणि त्याला मदत करत असलेला सफाई कर्मचारी मनोज कुमार यांचा समावेश आहे.