"पप्पा, मी अजून जिवंत आहे..."; अंत्यसंस्कारानंतर आला लेकीचा Video कॉल, नेमकं काय घडलं?
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2023 10:27 AM2023-08-21T10:27:25+5:302023-08-21T10:28:38+5:30
अंशू कुमारी एक महिन्यापूर्वी गायब झाली होती. घरच्यांनी तिचा खूप शोध घेतला मात्र मुलीचा शोध लागला नाही.
एक व्यक्ती आपल्या मुलीच्या श्राद्धाची तयारी करत होता. कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला होता. महिनाभरापूर्वी त्यांची मुलगी बेपत्ता झाली होती. नंतर एक मृतदेह आढळून आला, वडील आणि कुटुंबीयांनी कपडे पाहून पोलिसांना सांगितले की ही आमची मुलगी आहे. यानंतर परिसरातील लोकही दु:खी झाले. पण अचानक त्याच मृत मुलीने वडिलांच्या मोबाईलवर कॉल केला आणि म्हणाली, 'पप्पा, मी जिवंत आहे, मेली नाही.' पोलिसांनी सांगितलं की, हे प्रकरण पूर्णियाच्या अकबरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीशी संबंधित आहे. येथे राहणारी अंशु कुमारी महिनाभरापूर्वी अचानक गायब झाली.
अंशू कुमारी एक महिन्यापूर्वी गायब झाली होती. घरच्यांनी तिचा खूप शोध घेतला मात्र मुलीचा शोध लागला नाही. गेल्या आठवड्यात पोलिसांनी स्थानिक कालव्यातून एका मुलीचा मृतदेह बाहेर काढला होता. यानंतर अंशूच्या कुटुंबीयांनी कपड्याच्या आधारावर ओळख पटवली होती. पाण्यात बुडल्यामुळे चेहरा इतका सुजला होता की ओळखणं जवळपास अशक्य होतं. वडिलांना धक्का बसला. शेवटी आजोबांनी मुलीचं श्राद्ध पूर्ण करण्यास सांगितलं.
अंशूने यानंतर वडील विनोद मंडल यांच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल केला. तिने सांगितलं की "पप्पा मी अजून जिवंत आहे." यानंतर श्राद्धाच्या तयारीत असलेल्या कुटुंबीयांना नेमकं काय झालं हे समजलच नाही. अंशूने तिच्या वडिलांना पुढे सांगितले की, ती तिच्या प्रियकराशी लग्न करण्यासाठी घरातून पळून गेली होती. सध्या ती पूर्णियाच्या बनमंखी ब्लॉकमधील जानकी नगर भागात तिच्या सासरच्या घरी राहते.
अकबरपूरचे एसएचओ सूरज प्रसाद यांनी सांगितले की, जेव्हा मला घटनेची माहिती मिळाली, तेव्हा सत्य जाणून घेण्यासाठी मी मुलीच्या मोबाईलवर व्हिडीओ कॉल केला. तिने मला सांगितले की ती तिच्या सासरच्यांसोबत ठीक आहे. जिचा मृतदेह सापडला ती मुलगी कोण होती असा प्रश्न आता पडला आहे. सध्या या घटनेची सर्वत्र चर्चा रंगली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.