रेल्वेमधील बिर्याणीमध्ये सापडली मृत पाल, सुरेश प्रभूंना ट्विट करताच कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2017 10:57 AM2017-07-26T10:57:54+5:302017-07-26T11:11:25+5:30

उत्तर प्रदेशमधील प्रवाशांना देण्यात आलेल्या बिर्याणीत मृत पाल आढळली असल्याची घटना समोर आली आहे

A dead lizard found in biryani served to railway passengers | रेल्वेमधील बिर्याणीमध्ये सापडली मृत पाल, सुरेश प्रभूंना ट्विट करताच कारवाई

रेल्वेमधील बिर्याणीमध्ये सापडली मृत पाल, सुरेश प्रभूंना ट्विट करताच कारवाई

Next
ठळक मुद्देपूर्वा एक्स्प्रेसमधील घटनाप्रवाशांनी तक्रार करुनही कारवाईकडे दुर्लक्षसुरेभ प्रभूंना ट्विट करताच अधिका-यांची धावाधाव

नवी दिल्ली, दि. 26 -  भारतीय रेल्वे कॅटरिंग सर्व्हिसची सीएजीच्या रिपोर्टमुळे पोलखोल झाली असतानाच पुन्हा आता तर याचं प्रात्यक्षिकही मिळालं आहे. उत्तर प्रदेशमधील प्रवाशांना देण्यात आलेल्या बिर्याणीत मृत पाल आढळली असल्याची घटना समोर आली आहे. पूर्वा एक्स्प्रेसमध्ये प्रवास करणा-या प्रवाशांना देण्यात आलेल्या बिर्याणीमध्ये ही मृत पाल आढळली. सीएजी ऑडिट रिपोर्ट संसदेत ठेवण्यात आला होता, ज्यामध्ये रेल्वे स्टेशनांवर खाण्या-पिण्याचे जे पदार्थ बनवण्यात येतात, ते खाण्यायोग्य नाहीत. ट्रेन आणि स्टेशनांवर बनवण्यात येणारे खाद्यपदार्थ हे प्रदूषित असतात असा अहवाल देण्यात आला होता.


काही यात्रेकरु झारखंडहून उत्तर प्रदेशच्या दिशेने निघाले होते. ट्रेन पाटणाजवळ पोहोचली असता त्यांना बिर्याणी देण्यात आली. मात्र बिर्याणीचं ते पॅकेट उघडून पाहिलं असता त्यामध्ये मृत पाल असल्याचं लक्षात आलं. खराब बिर्याणीमुळे एका प्रवाशाची तब्बेत बिघडली. यानंतर उपस्थित स्टाफकडे तक्रार करण्यात आली, मात्र त्यांनी बिर्याणी ट्रेनमधून बाहेर फेकण्याव्यतिरिक्त काही केलं नाही. टीसी आणि पॅँट्री कार अटेंडंटकडे तक्रार करुनही त्यांना काहीच उत्तर मिळालं नाही. यानंतर प्रवाशांनी केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांना ट्विट करुन घटनेची माहिती दिली. 


ट्विट केल्याचा फायदा प्रवाशांना झाला आणि ट्रेन मुघलसराई स्थानकावर पोहोचली असता काही अधिकारी ट्रेनमध्ये आले आणि सर्वात प्रथम तब्बेत बिघडलेल्या प्रवाशाला औषध दिले. 


'प्रवाशांची प्रकृती आमच्यासाठी सर्वात मोठा चिंतेचा विषय होता. ट्रेन पोहोचण्याआधीच डॉक्टरांनी त्यांच्या तब्बेतीची चौकशी करत औषध सांगितले होते. या घटनेचा तपास करत, कडक कारवाई करु', असं रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी किशोर कुमार यांनी दिली आहे. या घटनेचा रिपोर्ट मंत्रालयाकडे सोपवण्यात येणार आहे. 


रेल्वेत बनवलेले जेवण निकृष्ट दर्जाचे असल्याचं सीएजी रिपोर्टमधून उघड
रेल्वे परिसर आणि ट्रेनमध्ये अजिबात साफसफाई नसते. ट्रेनमध्ये विकण्यात येणा-या अन्न पदार्थांचं बिल दिलं जात नाही. अन्नपदार्थांच्या दर्जाबाबतही प्रवाशांच्या अनेक तक्रारी आहेत. सीएजी आणि रेल्वेच्या संयुक्त टीमनं 74 स्टेशन्स आणि 80 ट्रेनची पाहणी केली. या पाहणीदरम्यान ट्रेन आणि स्टेशनांवर साफसफाईची बोंबाबोंब असल्याचं निदर्शनास आलं.  


रिपोर्टनुसार, पाण्याच्या बाटल्या सरळ सरळ नळातील अशुद्ध पाण्यानं भरण्यात येतात आणि त्यानंतर त्या पॅकिंग केल्या जातात. अनेक स्टेशनांवर कच-याच्या डब्यांवर झाकणंच नसून, त्यांची साफसफाई केली जात नसल्याचं समोर आलं. खाद्यपदार्थांना माश्या, किडे आणि धुळीपासून वाचवण्यासाठी झाकून ठेवलं जात नाही. त्याप्रमाणेच ट्रेनमध्ये झुरळं आणि उंदीरही आढळले आहेत. ट्रेनमध्ये वेटर आणि कॅटरिंग मॅनेजरकडे विकण्यात येणा-या खाद्यपदार्थांचं कोणतंही मेनूकार्ड नसणे. खाण्याचे पदार्थ ठरलेल्या प्रमाणापेक्षा कमी देणे यांसारख्या गोष्टी रिपोर्टमधून समोर आल्या आहेत. ऑडिट रिपोर्टमधून रेल्वेच्या वारंवार बदलणा-या कॅटरिंग पॉलिसीवरही सवाल उपस्थित करण्यात आला.

Web Title: A dead lizard found in biryani served to railway passengers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.