निष्काळजीपणाचा कळस! शाळेतील मध्यान्ह भोजनात सापडली मेलेली पाल, 80 मुलं पडली आजारी
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 03:12 PM2021-12-28T15:12:07+5:302021-12-28T15:14:19+5:30
Dead Lizard Found In Midday Meal : शाळेत लहान मुलांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनात मेलेली पाल आढळून आली आहे.
नवी दिल्ली - कर्नाटकमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. शाळेत लहान मुलांना देण्यात येणाऱ्या मध्यान्ह भोजनात मेलेली पाल आढळून आली आहे. यामुळे तब्बल 80 मुलं आजारी पडली आहेत. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. कर्नाटकच्या हावेरी जिल्ह्यातील रानीबेन्नूर जवळील व्यंकटपुरा टांडा गावामध्ये 27 डिसेंबर रोजी ही घटना घडली. सरकारी शाळेत लहान मुलांना मधल्या सुट्टीत पोषण आहार देण्यात येतो. त्यामध्ये ही मेलेली पाल सापडली आहे.
जेवणात मेलेली पाल असल्याचं आढळून आल्यानंतर साधारण 80 मुलांची तब्येत बिघडली आहे. त्यानंतर मुलांना तातडीने सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. शाळा प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, या मुलांची तब्येत आता ठीक असून त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. जिल्हा प्रशासनाने दुर्लक्ष केल्याप्रकरणी शाळेवर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
काही दिवसांपूर्वीच तमिळनाडूमध्येही असा प्रकार घडला होता. अंगणवाडीतील चिमुकल्यांसाठीच्या पोषण आहारात अंडी देण्यात आली होती. मात्र ही अंडी सडलेली होती, तसंच त्यात किडे झाले होते. काही विद्यार्थ्यांना अंड्यातून विचित्र वास येत असल्याचं जाणवलं. त्यानंतर त्यांनी शाळा व्यवस्थापनाला याविषयी माहिती दिल्याने हा भयंकर प्रकार उघड झाला होता. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.