जीएसटी विवरणपत्र भरण्यास मुदतवाढ, अधिसूचना लवकरच जारी होणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 01:45 AM2017-10-31T01:45:25+5:302017-10-31T01:46:11+5:30
जुलै २०१७ ची जीएसटीआर-२ आणि जीएसटीआर-३ ही जीएसटी विवरणपत्रे भरण्यास अनुक्रमे ३० नोव्हेंबर आणि ११ डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यावसायिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.
नवी दिल्ली : जुलै २०१७ ची जीएसटीआर-२ आणि जीएसटीआर-३ ही जीएसटी विवरणपत्रे भरण्यास अनुक्रमे ३० नोव्हेंबर आणि ११ डिसेंबर २०१७ पर्यंतची मुदतवाढ देण्यात आली आहे. व्यावसायिकांच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे सरकारी सूत्रांनी म्हटले आहे.
जीएसटीआर-२ विवरणपत्र भरणा-या व्यावसायिकांची संख्या सुमारे ३०.८१ लाख आहे. हे विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख ३१ आॅक्टोबर होती. ती आता ३० नोव्हेंबर करण्यात आली आहे. यासंबंधीची अधिसूचना लवकरच जारी होणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. जीएसटीआर-१ विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख १० आॅक्टोबर होती. केपीएमजी इंडियाचे भागीदार प्रियजीत घोष यांनी सांगितले की, जीएसटीआर-२ विवरणपत्र भरताना करदात्यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता.
‘जीएसटीआर-२ ए’कडून स्वीकारलेल्या क्रेडिट जीएसटी पोर्टलवर शेवटच्या क्षणापर्यंत दिसत नव्हते. त्यामुळे या विवरणपत्रास मुदतवाढ मिळणे अटळच होते. जीएसटीआर-३ विवरणपत्र भरण्यासाठी ‘जीएसटीआर-२’चे क्रेडिट आवश्यक आहे. त्यामुळे ‘जीएसटीआर-२’ला मुदतवाढ मिळणे अपेक्षितच होते.
सूत्रांनी सांगितले की, अंतिम जीएसटीआर-३ भरताना ते जीएसटीआर-१ आणि २ शी मॅच करावे लागते. हे मॅचिंग होत नव्हते. त्यामुळे ‘जीएसटीआर-३’लाही ११ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली.