तेजस्वी यादव यांना राजीनामा देण्यासाठी नितीश कुमारांकडून डेडलाईन
By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2017 04:16 PM2017-07-25T16:16:31+5:302017-07-25T17:35:58+5:30
अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार प्रयत्न करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे
पाटणा, दि. 25 - अधिवेशनाला सुरुवात होण्याआधी उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी राजीनामा द्यावा यासाठी मुख्यमंत्री नितीश कुमार प्रयत्न करत असल्याची माहिती सुत्रांकडून मिळाली आहे. शुक्रवारपासून राज्याच्या अधिवेशनाला सुरुवात होत आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे पक्षाची प्रतिमा खराब होऊ नये यासाठी नितीश कुमार लवकरात लवकर तेजस्वी यादव यांचा राजीनामा मिळावा यासाठी प्रयत्नशील आहेत. तेजस्वी यादव यांच्या उपस्थितीमुळे तुम्ही अस्वस्थ आहात का ? असा सवाल पत्रकाराने विचारला असता आपल्या सरकारला कोणताही धोका नसल्याचं त्यांनी सांगितलं.
सीबीआयने हॉटेलच्या गैरव्यवहार प्रकरणात तेजस्वी, लालू प्रसाद यादव आणि राबडी देवी विरोधात गुन्हा दाखल केला आहे. रेल्वेच्या दोन हॉटेल्सच्या देखभालीचे कंत्राट देण्याच्या मोबदल्यात पाटणा येथील मोक्याचा भूखंड पदरात पाडून घेतल्याचा या तिघांवर आरोप आहे. 2006 मध्ये लालू प्रसाद यादव रेल्वेमंत्री असताना हा व्यवहार झाला होता. दरम्यान लालू प्रसाद यादव यांनी पक्षाची बैठक बोलावून या पायरीवर तेजस्वी यादव यांनी राजीनामा दिला पाहिजे की नाही यावर चर्चा केली.
नितीश कुमार यांनी पुढील 72 तासांत तेजस्वी यादव आपला राजीनामा सुपूर्द करतील अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. दोन्ही पक्षांमध्ये सुरु असलेला वाद कमी व्हावा यासाठी तेजस्वी यादव यांनी गेल्या आठवड्यात नितीश कुमार यांची भेट घेतली होती. मात्र यामधून कोणताही तोडगा मिळाला नाही. नितीश कुमार यांनी यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना फोन करुन मध्यस्थी करण्याची मागणी केली होती. मात्र काँग्रेसला त्यामध्ये म्हणावं तसं यश मिळालं नाही. नितीश कुमार यांनी दिल्लीला जाऊन काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचीही भेट घेतली होती. मंगळवारी पार पडलेल्या रामनाथ कोविंद यांच्या शपथविधीला नितीश कुमार आणि राहुल गांधी उपस्थित होते. यावेळी राहुल गांधींना विचारलं असता, 'हा आमच्यातील अंतर्गत मुद्दा आहे', असं सांगितलं.