मोबाइलपासून ते बँक खातं सगळं काही आधारशी लिंक करण्याची डेडलाइन 31 मार्च
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2017 11:42 AM2017-12-15T11:42:46+5:302017-12-15T11:53:59+5:30
सर्वोच्च न्यायालयाने बँक खातं आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च करण्याचा आदेश दिला आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि लोककल्याणकारी स्कीमसाठीही ही नवी डेडलाइन देण्यात आली आहे.
नवी दिल्ली - सर्वोच्च न्यायालयाने बँक खातं आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च करण्याचा आदेश दिला आहे. तसंच वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणि लोककल्याणकारी स्कीमसाठीही ही नवी डेडलाइन देण्यात आली आहे. याशिवाय मोबाइल आधारशी लिंक करण्यासाठी देण्यात आलेली डेडलाइनदेखील वाढवण्यात आली आहे. याआधी 6 फेब्रुवारी ही डेडलाइन देण्यात आली होती, जी वाढवून 31 मार्च करण्यात आली आहे.
नुकतंच, सर्वोच्च न्यायालयाने बँक खातं आधारशी लिंक करण्याची अखेरची तारीख रद्द केली होती. अखेरची तारीख रद्द करण्याआधी बँक खातं आधारशी लिंक करण्यासाठी 31 डिसेंबर 2017 ही डेडलाइन होती. आता ही तारीख वाढवण्यात आली असून 31 मार्च 2018 करण्यात आली आहे. सरकारने सरकारी योजनेअंतर्गत योजनांचा फायदा घ्यायचा असल्यास आधार कार्ड बँक खात्यांशी जोडणं अनिवार्य केलं आहे. नवीन बँक खातं उघडणा-यांनाही सर्वोच्च नयायालयाने दिलासा दिला आहे. नवीन बँक खातं उघडणारे आधार कार्डशिवाय खातं उघडू शकतात, पण त्यांना आधारसाठी अर्ज केल्याचा पुरावा सादर करावा लागेल असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितलं आहे. याआधी नवीन बँक खातं उघडण्यासाठी आधार कार्ड सादर करणं अनिवार्य होतं.
#FLASH#Aadhaarcase: Supreme Court agreed to Centre's submissions of the deadline of linking Aadhaar with all schemes till March 31 pic.twitter.com/kcrcwocGHR
— ANI (@ANI) December 15, 2017
पेन्शन, एलपीजी सिलेंजर, सरकारी स्कॉलरशिपसाठी आधार कार्डची माहिती देणं गरजेचं आहे. सरकारने आता वाहतूक परवान्यासाठीही आधार कार्ड अनिवार्य केलं आहे.
The five-judge Constitution bench of Supreme Court passed the interim order, also extended the linking of #Aadhaar with mobile phone
— ANI (@ANI) December 15, 2017
सरकारने आधार आणि पॅन कार्ड लिंक करण्याची शेवटची तारीख वाढवून 21 मार्च 2018 केलेली आहे. पॅन कार्ड आधारशी लिंक केलं नसेल तर पुढील वर्षीपासून टॅक्स जमा करता येणार नाहीये. यावर्षीदेखील ज्या लोकांनी पॅन आधारशी लिंक केलं नव्हतं, त्यांना टॅक्स जमा करताना अनेक समस्यांचा सामना करावा लागला होता. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे सरकारला दिलासा मिळाला आहे.
पॅन आधारशी लिंक करताना लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. पॅन आणि आधारमधील माहितीमध्ये जरा जरी फरक असला म्हणजे स्पेलिंगमध्ये एक अक्षर जरी पुढे मागं असलं तरी लिंक होत नाहीये. आधी दोन्ही कार्डवरील माहिती समान करावी लागेल त्यानंतर लिंक करता येईल.