आधार कार्ड जोडणीची मुदत 31 मार्च 2018 वाढली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2017 12:04 PM2017-12-07T12:04:42+5:302017-12-07T14:56:38+5:30
विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड जोडणीची मुदत आता 31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
नवी दिल्ली - विविध कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यासाठी आधार कार्ड जोडणीची मुदत आता 31 मार्च 2018 पर्यंत वाढवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. आधार कार्ड बंधनकारक करण्याच्या मुद्द्यावर सुप्रीम कोर्टात दाखल याचिकेवरील सुनावणीवेळी सरकारने ही माहिती दिली आहे. दरम्यान, यापूर्वी 31 डिसेंबर 2017 पर्यंत आधार कार्ड जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. या निर्णयाला आव्हान देणा-या याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.
दरम्यान, 'आधार कार्ड सक्तीचा निर्णय मागे घेऊ शकत नाही. केंद्र सरकार यावर चर्चा करण्यास तयार आहे,' असे अॅटर्नी जनरल के. के. वेणुगोपाल यांनी सांगितले. दरम्यान, या याचिकांवर सुनावणी घेण्यासाठी 5 सदस्यांचे घटनापीठ स्थापन करण्यात येईल, असे सरन्यायाधीश दीपक मिश्रा यांनी सांगितले आहे.
आधार कार्ड जोडणी कराच, अन्यथा हे होणार तोटे
आधारकार्ड पॅनकार्डशी करा लिंक
आधारकार्डचा नंबर पॅनकार्डशी लिंक करणं सरकारने बंधनकारक केलं आहे. आधारकार्ड पॅन कार्डशी लिंक नसेल तर आयटी रिटर्न फाइल करता येणार नाही. आयटी रिटर्न भरण्याची प्रक्रिया होणार नाही.
आधारकार्ड बँक अकाऊंट नंबरशी करा लिंक
आधारकार्ड बँक अकाऊंटशी लिंक करणंही सरकारकडून बंधनकारक करण्यात आलं आहे. बँक अकाऊंट नंबर आधारशी लिंक नसेल तर खातेधारकाचं अकाऊंट ब्लॉक केलं जाणार आहे. त्यामुळे भविष्यातील हा तोटा टाळण्यासाठी तुमचा अकाऊंट नंबर आधारकार्ड नंबरशी लिंक करा.
म्युच्युअल फंडात पैसे गुंतविणाऱ्यांनीही करा आधार लिंक
म्युच्युअल फंडात ज्यांनी पैसे गुंतविले आहेत त्यांनाही आधार लिंक करणं सक्तीचं आहे. तसं न केल्यास तुमचं म्युच्युअल फंडाचं खातं गैर ठरवलं जाणार आहे. ज्याचं आधारकार्ड लिंक नसेल त्यांचं खातं नॉन ऑपरेटेबल होणार आहे.
इन्श्युरन्स पॉलिसी धारकांनीही करा आधारकार्ड लिंक
इन्श्युरन्स पॉलिसी धारकांनाही आधारकार्ड लिंक करणं गरजेचं आहे. तसं न केल्यास इन्श्युरन्स पॉलिसीचा लाभ तुम्हाला घेता येणार नाही.
पोस्टाशी संबंधित काम
पोस्टाशी संबंधित गोष्टी म्हणजेच पीपीएफ, केव्हीपी, ठेवी अशा विविध सुविधांसाठी आधारकार्ड लिंक करणं बंधनकारक आहे. अन्यथा खातेधारकाचं खातं ब्लॉक होणार आहे.
मोबाइल नंबर करा आधारकार्डशी लिंक
मोबाइल नंबर आधारकार्डशी लिंक करणं बंधनकारक आहे. तसं न केल्यास तुमचा मोबाइल नंबर डीअॅक्टीवेट केला जाईल.
एलपीजी, पेन्शन सारख्या सुविधांसाठी आधार कार्ड लिंक सक्तीचं
एलपीजी, पेन्शन यासारख्या सरकारी सुविधांचा लाभ मिळविण्यासाठी आधार कार्ड लिंक असणं गरजेचं आहे. आधार लिंक नसेल तर सरकारी योजनांपासून मुकावं लागणार आहे.