जीवाचा सौदा! प्रति तास आकारले जातात १० हजार रुपये; रुग्णांच्या लुटीची धक्कादायक बातमी समोर
By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 03:35 PM2021-04-29T15:35:53+5:302021-04-29T15:38:08+5:30
रुग्णाचं सैच्युरेशन ठीक असलं तरी त्याला ऑक्सिजनची गरज असल्याचं सांगितलं जातं. ऑक्सिजनचा तुटवडा होऊ लागल्यापासून काही रुग्णालयं ऑक्सिजनच्या नावाखाली रुग्णांना लुटत आहेत.
कानपूर – कोरोनासारख्या महामारी संकटात काही खासगी हॉस्पिटलकडून रुग्णांच्या नातेवाईकांना लुटायचे प्रकार करत असल्याचं समोर येत आहे. रुग्णांना अवाजवी बिल आकारलं जात आहे. यात प्रत्येक तासाला १० हजार अशा सरासरीने बिल आकारलं जात असल्याचं उघड झालं आहे. कोविड रुग्णालयासोबतच नॉन कोविड रुग्णालयातही रुग्णांकडून फायदा उचलला जात आहे.
रुग्णाचं सैच्युरेशन ठीक असलं तरी त्याला ऑक्सिजनची गरज असल्याचं सांगितलं जातं. ऑक्सिजनचा तुटवडा होऊ लागल्यापासून काही रुग्णालयं ऑक्सिजनच्या नावाखाली रुग्णांना लुटत आहेत. जर कोणत्या रुग्णांची ऑक्सिजन पातळी ९० आली तरीही त्याला घाबरवलं जातं. त्यानंतर त्याला ऑक्सिजन लावलं जातं. ऑक्सिजन लावताच रुग्णांचे हॉस्पिटल बिल वेगाने वाढू लागतं. अशातच पुन्हा रुग्णाला आयसीयूची गरज असल्याचं कळवलं जातं. त्यानंतर रुग्णांचं हॉस्पिटल बिल कित्येक पटीने वाढतं.
कोरोनाचा नवा स्ट्रेन आल्यानंतर सगळीकडे परिस्थिती गंभीर बनली आहे. कोरोना संक्रमित रुग्णांच्या आरटीपीसीआर रिपोर्टमध्ये फुस्फुस्स खराब होते. कोरोनाच्या नव्या स्ट्रेनमुळे लोकांच्या मनात भीतीचं वातावरण आहे. खासगी हॉस्पिटलने ऑक्सिजनव्यतिरिक्त कमाईचे अन्य मार्गही तयार केले आहेत. यात पीपीई किट्सचा खर्च दाखवला जातो. आरोग्य विभागाने अवाजवी बिल आकारणाऱ्या हॉस्पिटलविरोधात एफआयआर दाखल केला आहे. तरीही हे प्रकरण थांबत नाहीत. सीएमओ डॉ. अनिल मिश्रा यांनी या संबंधात आदेश जारी करून हॉस्पिटलने रुग्णांना लुटायचे प्रकार बंद करून महामारीच्या संकटात एकत्रित लढण्यासाठी सहकार्य करा असं म्हटलं आहे.
५ तासांत ५० हजार वसुली
केडीए कॉलनीत राहणाऱ्या ४८ वर्षीय महिला चुन्नीगंजच्या एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल होती. तिला ५ तास रुग्णालयात दाखल केले त्यानंतर त्या महिला रुग्णाचे बिल ५० हजार रुपये झाले. या महिलेची ऑक्सिजन पातळी ९२ च्या आसपास होती. ब्लड शुगर वाढली होती. कोरोना संक्रमण नव्हतं. श्वास घेण्यास अडचण नव्हती. तरीही तिला ऑक्सिजन लावण्यास सांगून आयसीयूमध्ये ठेवण्यात आलं. नवरा परदेशात असल्याने ती चिंतेत होती. त्यानंतर तिच्या नातेवाईकांनी या महिला रुग्णाला दुसऱ्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले.