ऑपरेशनदरम्यान फुप्फसात ब्लेड राहिल्याने २ वर्षांच्या बालिकेचा मृत्यू
By admin | Published: March 5, 2016 09:15 AM2016-03-05T09:15:33+5:302016-03-05T09:17:04+5:30
ऑपरेशनदरम्यान फुफ्फुसांत सर्जिकल ब्लेड राहिल्याने दिल्लीत एका २ वर्षांच्या बालिकेला जीव गमवावा लागला.
Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. ५ - दिल्लीतील सफदरजंग रुग्णालयात डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे एका दोन वर्षांच्या चिमुरडीला जीव गमवावा लागला. ऑपरेशनदरम्यान फुफ्फुसांत सर्जिकल ब्लेड राहिल्याने या चिमुरडीचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी त्या चिमुरडीच्या पालकांनी डॉक्टरांविरोधात पोलिसांत दाखल केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, या दोन वर्षांच्या चिमुरडीच्या फुफ्फुसात पस झाल्याने तिच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. मात्र त्यानंतरही तिची प्रकृती सुधारली नाहीच. त्यामुळे तिची पुन्हा तपासणी करण्यात आली असता आधीचे ऑपरशन करताना तिच्या फुफ्फुसात सर्जिकल ब्लेड राहिले होते. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे हा प्रकार घडला आणि त्या मुलीची तब्येत आणखीनच बिघडली. त्यानंतर तिच्यावर दुस-यांदा शस्त्रक्रिया करून ते ब्लेड बाहेर काढण्यात आले, मात्र त्याचा काहीह उपयोग झाला नाही. दिवसेंदिवस त्या चिमुरडीची प्रकृती आणखी खालावत गेली आणि अखेर तिचा मृत्यू झाला.
दिल्लीतील वजिराबाद भागात राहणा-या त्या मुलीच्या पालकांनी डॉक्टरांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करत त्यांच्याविरोधात कडक कारवाईची मागणी केली. ही तक्रार मेडिकल काऊन्सिल ऑफ इंडियाकडेही पाठवण्यात आली असून, त्या तपासत डॉक्टर दोषी सिद्ध झाल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असे रुग्णालयाच्या अधिका-यांनी स्पष्ट केले.